राज्यात धुक्या सह थंडीतही वाढ!!

पुणे, दि. १८ डिसेंबर : हवेत आर्द्रता असल्याने गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत पहाटे धुक्याची चादर पसरत असल्याने हा गारठा आल्हाददायक वाटत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मराठवाड्यासह, विदर्भातील अनेक भागांत गारठा वाढणार आहे.
       गुरुवारी (ता. १७)  सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठ येथे १३.७ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली, अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
 राज्यात आकाश निरभ्र झाल्याने गारठा हळूहळू वाढू लागला आहे. त्यातच उत्तरेकडील पंजाब, हरियाना, चंडीगड, उत्तर प्रदेश, राजस्थान या भागांत थंडीची लाट आली आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार असून, उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह पुन्हा वाहू लागले आहेत. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत गारठा वाढला आहे. किमान तापमानात घट होऊ लागली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
दक्षिण भारताच्या पूर्व भागातील कोमोरीन परिसर आणि श्रीलंकेचा परिसरातही चक्रीवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवस थंडीत काही अंशी चढ-उतार राहणार आहे. उत्तर भारतातही गेल्या काही दिवस पाऊस झाल्याने हवेत गारवा असल्याने काही भागांत थंडीची लाट आली आहे. त्यामुळे या भागात किमान तापमानात आणखी घट होईल. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होण्याची शक्यता आहे.    
गुरुवारी (ता. १७) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई (सांताक्रूझ) २१ (३), अलिबाग २०.८ (३), ठाणे २२, रत्नागिरी २१.८ (२), डहाणू १९.२ (१), पुणे १५.८ (५),  जळगाव १६.७ (५), कोल्हापूर १८.९ (५), महाबळेश्‍वर १५.४ (२), मालेगाव १७.६ (६), नाशिक १६ (६), निफाड १६.४, सांगली १९.३ (५), सातारा १६.९ (५), सोलापूर १७.२ (१), औरंगाबाद १६.४ (५), बीड १८.३ (५), परभणी १४.९ (२), परभणी कृषी विद्यापीठ १३.७, नांदेड १८ (६), उस्मानाबाद १७ (४), अकोला १७.५ (५), अमरावती १७.७ (३), बुलडाणा १६ (२), चंद्रपूर १८.२ (५), गोंदिया १६.६ (५), नागपूर १७.५ (५), वर्धा १७.४ (४), यवतमाळ १६.५ (२).

Post a comment

0 Comments