तसेच, विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
जम्मू, काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशाच्या बहुतांश भागात गेल्या पाच-सहा दिवसांपासून हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे पंजाब, हरियाना, दिल्ली, उत्तर राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग येथे थंडीची लाट पसरली आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात थंडी वाढते. हा थंड वाऱ्यांचा प्रभाव सध्या वाढत असल्याने राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमानाचा पारा घसरल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदण्यात आले. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान परभणीत 7 अंश सेल्सिअस, तर गोंदिया येथे 7.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले.
राज्यात येत्या दोन ते तीन दिवस राज्यातही काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात हवामान कोरडे आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत थंडी वाढली आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा चांगलाच घरसला आहे. विदर्भातील काही भागांत कडाक्याची थंडी आहे.
किमान तापमान घसरले
राज्यात संध्याकाळनंतर थंडी वाढण्यास सुरुवात होत आहे. मध्यरात्रीनंतर थंडी वाढत जाऊन पहाटे चांगलीच थंडी वाढत आहे. थंडीमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. विदर्भातील अनेक भागांतील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षा खाली आला आहे. तर अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर या भागांत किमान तापमान 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
मराठवाड्यातही किमान तापमानात सरासरीच्या तुलनेच दोन ते तीन अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. या भागात 7 ते 18 अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, नाशिक, जळगाव या भागांत थंडीने जम बसविण्यास सुरुवात केली आहे. या भागात किमान तापमान 12 ते 17 अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदविले गेले. कोकणात बऱ्यापैकी थंडी वाढली आहे. यामुळे या भागात 20 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमानाची नोंद झाली आहे.
राज्यातील थंडी (सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये)
परभणी (कृषी विद्यापीठ) 7
गोंदिया 7.4,
नागपूर 8.6,
वर्धा 10.2
जळगाव 12,
महाबळेश्वर 12.1,
पुणे 12.2
नाशिक 12.2,
औरंगाबाद 12.4,
अकोला 12.6,
अमरावती 12.7,
मालेगाव 13.2,
नांदेड 13.5,
बुलडाणा 13.8,
सातारा 14.8,
सोलापूर 15.5,
सांगली 16.5,
कोल्हापूर 17.1,
डहाणू 20.4,
मुंबई (सांताक्रूझ) 21.8
रत्नागिरी 22.4
0 Comments