छत्तीसगढमध्ये नववीतील विद्यार्थिनीवर १३ दिवस आठ जणांकडून सामूहिक बलात्कार

रायपूर: छत्तीसगढच्या बलरामपूर जिल्ह्यात नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर आठ जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल १३ दिवस या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी आठ जणांना अटक केली असून त्यापैकी सहाजण अल्पवयीन असल्याचीही धक्कादायक माहितीही समोर आली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी २० नोव्हेंबरला मैत्रिणींना भेटायला जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली होती. त्यानंतर गांधीनगर परिसरात ती मैत्रिणीसोबत आलेल्या एका तरुणाला भेटली. या तरुणाने पीडित मुलीला आपल्यासोबत येण्यास राजी केले. त्यानंतर तरुणाने या मुलीवर बलात्कार केला.
या तरुणाने बलात्कार केल्यानंतर या मुलीला सोडून न देता आपल्या मित्रांच्या ताब्यात दिले. त्यानंतर १३ दिवस या मुलीवर सात वेगवेगळ्या जणांकडून बलात्कार करण्यात आला.
तर दुसरीकडे या मुलगी बेपत्ता झाल्यामुळे तिच्या घरातील लोक चिंतेत पडले होते. त्यांनी २० नोव्हेंबरला राजापूर पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलीच्या तपासाला सुरुवात केली. या मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती.
अखेर एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्याआधारे पोलिसांनी ५ डिसेंबरला अंबिकापुर जिल्ह्यातील सरगुजा येथून पीडित मुलीला हुडकून काढले. त्यानंतर पोलिसांनी या मुलीचा जबाब नोंदवून घेतला. आपल्यावर १३ दिवसांत आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे मुलीने पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांनाही प्रचंड धक्का बसला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरु करत सर्व आरोपांनी ताब्यात घेतले.

Post a comment

0 Comments