'तर शेतकरीच त्यांना पायातील काढून उत्तर देतील'कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली तिखट प्रतिक्रिया.

'तर शेतकरीच त्यांना पायातील काढून उत्तर देतील'
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली तिखट प्रतिक्रिया.

मुंबई - केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सध्या दिल्लीत शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (८ डिसेंबर) देशव्यापी भारत बंदची हाक शेतकऱ्यांकडून देण्यात आली आहे. या दरम्यान राजकिय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत आहे.
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपला धारेवर धरले आहे. 

'केंद्रातील सरकार नव्या कृषी विधेयकाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे हित साधणार आहे, असे भाजपाच्या नेत्यांनी गळ्यात पक्षाचा मफलर घालून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सांगण्याची हिंमत दाखवावी. त्यावर शेतकरीच त्यांना पायातील काढून उत्तर देतील,' अशी तिखट प्रतिक्रिया सतेज पाटीलांनी दिली.

ते पुढे म्हणाले, 'भाजप शेतकरी विरोधी असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. कृषी कायद्यात बद्दल होणार नाही, हे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे विधान याला समर्थन देतेय. नव्या कृषी कायद्यातून शेतकऱ्यांचा कसलाही लाभ होणार नाही. 

अंबानीची जिओ कंपनी सुरू झाल्यावर शासकीय बीएसएनएल दूरध्वनी कंपनी देशोधडीला लागली. तशीच अवस्था शेतकऱ्यांची या विधेयकामुळे होणार आहे,' असा आरोप सतेज पाटीलांनी केलाय. 'इचलकरंजी कापड व्यापारी दिवाळे काढून वारंवार पळून जातात. तसेच शेतकरी कायद्यामुळे कार्पोरेट कंपन्या पळून जाण्याचा धोका आहे. 

त्यामुळे या कायद्याला विरोध करण्यासाठी कॉंग्रेसचा उद्याच्या देशव्यापी बंदला पाठिंबा देणार आहे,' असेही त्यांनी सांगितले. 'त्यासाठी शेतकऱ्यांनी घर, शेत, बांधावर काळा झेंडा लावावा. लोक रस्त्यावर आल्यावर भाजपाचे सरकार घाबरत नाही, पण सोशल मीडियावर टीका व्हायरल झाली की बैचेन होतात. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते, नागरिकांनी उद्या मोबाइलवर निषेध दर्शक काळा डीपी ठेवावा,' असे आवाहन सतेज पाटलांनी केले.

Post a comment

0 Comments