कुत्र्याचे इंजेक्शन देऊन पत्नीने केला पती, मुलांचा खून 

नागपूर : उपराजधानीला हादरवून टाकणाऱ्या राणे कुटुंबीयांच्या आत्महत्येचे गूढ तब्बल चार महिन्यांनंतर समोर आले आहे. या प्रकरणात डॉ. सुषमा राणे (४०) यांनी पती डॉ. धीरज राणे (४५), ध्रुव (वय ११) व वण्या (वय ५) यांना कुत्र्याचे इंजेक्शन देऊन त्यांचा खून केल्यानंतर स्वत: गळफास लावल्याचे निष्पन्न झाले आहे. पतीच्या सततच्या संशयातूनच डॉ. सुषमा राणे यांनी टोकाची भूमिका घेतल्याचे पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाल्याची माहिती पोलिस उपायुक्त निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जगनाडे ले-आऊटमध्ये राहणाऱ्या डॉक्टर पती-पत्नींनी दोन मुलांसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना १८ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. यामध्ये डॉ. सुषमा राणे यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत बेडरूम जवळच्या स्टोअरमध्ये आढळला होता. तर इतर तिघांचे मृतदेह बेडरूममधील पलंगावर पडून होते. त्यांच्याकडे एक सुसाईड नोट आढळून आली होती. मृताची आत्या प्रमीला शास्रकार यांनी तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज हे सुषमा यांच्या चारित्र्यावर संशय घ्यायचे. धीरज यांनी सुषमा यांच्या मोबाईलचे कॉल स्वत:च्या मोबाईलवर वळविले होते. सुषमा यांना नातेवाईकांनाही फोन करण्यास मनाई होती. याशिवाय धीरज यांना दारूचे व्यसन जडले. त्यांचे अन्य महिलांशी मोबाईलवर अश्लील संभाषणही सुषमा यांना दिसले. त्यामुळे या दाम्पत्यामध्ये वाद व्हायला लागले.
धीरज यांनी आत्महत्येचा विचार बोलून दाखविला. धीरज यांच्या मृत्यूनंतर मुलांच्या व स्वत:च्या जगण्याला अर्थ राहणार नाही, असे सुषमा यांना वाटायला लागले. १८ ऑगस्टला पहाटे पाच वाजताच्या सुमारास सुषमा या मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेल्या. तेथून इंजेक्शन आणले.१७ ऑगस्टला धीरज भरपूर दारू प्यायले होते. त्यामुळे ते झोपले होते. इंजेक्शन घेऊन परतल्यानंतर सुषमा यांनी तिघांना इंजेक्शन दिले. यात त्यांचा मृत्यू झाला. सकाळी ११ नंतर सुषमा यांनाही गळफास घेऊन आत्महत्या केली, असे तपासादरम्यान स्पष्ट झाले आहे.

Post a comment

0 Comments