शासकीय कापूस खरेदी केंद्र नसल्याने शेतकर्‍यांची लूट

कापूस खरेदी केंद्र नसल्याने शेतकर्‍यांची लूट
पालम तालुक्याती यंदा अतिपावसामुळे कसेबसे तरलेले कपाशी पीक शेवटपर्यंत सावरू शकले नाही. उन्हाळ्यापर्यंत उत्पन्न देणार्‍या कपाशीचे यंदा एक-दोन वेचणीतच निकामी झाल्या असून शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

पालम : तालुक्याती यंदा अतिपावसामुळे कसेबसे तरलेले कपाशी पीक शेवटपर्यंत सावरू शकले नाही. उन्हाळ्यापर्यंत उत्पन्न देणार्‍या कपाशीचे यंदा एक-दोन वेचणीतच निकामी झाल्या असून शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. 
खासगी व्यापारी ही कापूस कमी दराने खरेदी करत असल्याने शेतकर्‍यांचे दिवाळे निघाले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पालम तालुक्यातील उमरा, खोरस पेठ, पिंपळगाव, सिरसम, फरकंडा, डिग्रस, जवळा, गुळखंड, फळा, पारवा, पेठशिवनी, रावराजुर ,चाटोरी, पारवा आदी गावातील परिसरात मुख्य पीक म्हणून मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली जाते. यंदाही परिसरात कपाशीचे क्षेत्र मोठे आहे. 

सुरुवातीपासून चांगला पाऊस असल्याने कपाशी चांगली तरारली होती. मात्र,सतत सुरू झालेला पाऊस कपाशीच्या मुळावर उठल्याने पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेतात पाणी साचल्याने ऐन फुले, पाते लागण्याच्या कालावधीत बसलेल्या फटक्याने कपाशी पीक नंतर तरी सावरले, अशी शेतकर्यांना आशा होती. त्यासाठी खर्चही करण्यात आला. मात्र,फायदा झाला नाही.

अशात पुन्हा लाल्या रोगासह बोंडअळीने धुमाकूळ घातल्याने उरलीसुरली आशाही मावळली. कपाशीची प्रथम वेचणीची तयारी सुरू असतानाच परतीच्या पावसाने पुन्हा दणका दिला. त्यामुळे झाडांवर कापूस ओला झाल्याने शेतकर्यांचे पुन्हा मोठे नुकसान झाले.सध्या तर एक व दोन वेचणीतच कपाशीचा सुपडा साफ झाला आहे. 

सततच्या पावसामुळे कपाशीचे झाड पाहिजे. त्या प्रमाणात अन्नद्रव्य बनवू शकले नाही.त्यामुळे पाऊस उघडताच ही झाडे पिवळी व लाल पडली त्यामुळे मोठ्या प्रमाणात कैर्‍या व पातेगळ झाली आहे. रानमाळ व कोरडवाहू जमिनीवरील कपाशी एका वेचणीतच उजाड झाली आहे. बागायती शेतीतील कपाशी यापेक्षा एक ते दोन वेचणी शिल्लक घेत आहे. मात्र शेतकर्‍यांनी लावलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी संकटात आहे.

शेतीचा खर्चही निघेना : यंदा अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कपाशीला केलेला खर्चही निघाला नाही. जो काही कापूस राहिला त्या कापसाला हमीभावपेक्षा कमी भाव मिळत आहे. यंदा दोन वेचणीतच कापूस संपला, असून खर्चापेक्षा उत्पन्न कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

शासकीय कापूस खरेदी केंद्र नसल्याने लूट : जवळपास खरीप पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी कापूस विक्री साठी काढत आहे. परंतु तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्याने शेतकर्‍यांना आपला कापूस विक्री करण्यासाठी बाहेरील तालुक्यातील जावे लागत आहे. 

शासकीय कापूस खरेदी केंद्र चालू असल्याचा फायदा व्यापारी मोठ्या प्रमाणात घेत असून, हमी भावापेक्षा कमी भावात कापूस खरेदी करत आहे. त्यातही ओल्या कापसाला तर सर्वात कमी भाव दिला जात असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

Post a comment

0 Comments