आता वर्गीकरण केलेलाच कचरा उचलणार.

आता वर्गीकरण केलेलाच कचरा उचलणार.

स्वच्छ सर्वेक्षणात रँकिंग वाढवण्यासाठी कठोर निर्णय.

औरंगाबाद :-  स्वच्छ सर्वेक्षणात शहराचे रँकिंग वाढवण्यासाठी महापालिकेने आता विविध पाऊले उचण्यास सुरूवात केली आहे. यातूनच आता पालिकेने वर्गीकरण केलेलाच कचरा उचलण्याचा निर्णय घेतलेला आहे. कचरा वर्गीकरण केलेला नसेल तर तो उचलला जणार नाही, अशी भूमिका पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी घेतली असून त्यानुसार यंत्रणेला आदेशही दिले आहेत. शहरातील छोट्या-मोठ्या दुकानदारांना आता डस्टबीनची सक्ती देखील केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालिका आयुक्त पांडेय यांचा हा निर्णय स्वच्छ सर्वेक्षणात शहराचे रँकिंग वाढण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणारा ठरणार आहे. यासोबतच कचरा प्रक्रिया केंद्रांची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. पालिकेने नियोजित केलेल्या चारपैकी चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरु झाला आहे. आता पडेगाव आणि कांचनवाडी येथील प्रकल्प देखील पूर्ण क्षमतेने सुरु होण्याच्या मार्गावर आहे. 

स्वच्छ सर्वेक्षणात कचरा वर्गीकरणाला महत्व दिलेले आहे. त्यामुळे वर्गीकरण नाही तर कचरा उचलणार नाही, अशी भूमिका पालिकेने घेतली असल्याचे आयुक्त पांडेय यांनी सांगितले. ज्या ठिकाणी कचर्‍याची निर्मिती होते, त्याच ठिकाणी कचर्‍याचे वर्गीकरण झाले पाहीजे, यावर लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी कचरा संकलन करणार्‍या प्रत्येक गाडीसाठी एका पर्यवेक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे. कचरा वर्गीकरणाची जबाबदारी त्याच्यावर दिली जाणार आहे. 

कचर्‍याचे वर्गीकरण झालेले असेल तरच कचरा उचला, असे स्पष्ट आदेश यंत्रणेला दिले जाणार आहेत. कचरा वर्गीकरणासंदर्भात रेड्डी कंपनीचे अधिकारी व पालिकेचे प्रभाग अधिकारी यांची बैठकही आयुक्तांनी नुकतीच घेतल्याचे नमूद केले.


डिसेंबर-जानेवारीत सक्तीने अंमलबजावणी :-

डिसेंबर-जानेवारी या दोन महिन्यात कचरा वर्गीकरण निर्णयाची सक्तीने अंमलबजावणी केली जाणार आहे. 

ओला कचरा, सुका कचरा, वैद्यकीय किंवा धोकादायक कचरा आणि बांधकाम साहित्याचा कचरा अशा चार प्रकारात कचर्‍याचे विलगीकरण झाले पाहिजे, अशी सक्ती आता केली जाणार आहे. यासाठी सिटी रिस्पॉन्स टीमची मदत घेतली जाईल. ही संस्था पालिकेबरोबर सल्लागार म्हणून काम करणार आहे.

दुकानदारांना डस्टबीन वापरणे सक्तीचे :-

यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक लहान-मोठ्या दुकानदारांना डस्टबीन वापरणे सक्तीचे केले जाणार आहे. 
दुकानदारांनी त्यांच्या दुकानात दर्शनीभागातच डस्टबीन ठेवावे, असे सांगण्यात येणार आहे. दुकानासमोर डस्टबीन ठेवले जाते की नाही, याची नियमीत पाहणी देखील पालिकेच्या पथकांकडून केली जाणार आहे.

Post a comment

0 Comments