मराठा व ओबीसींमध्ये वाद लावू नका; प्रविण दरेकर यांचा इशारा

मुंबई ः मराठा समाजाच्या तरुणांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारने केला तर त्याठिकाणी मी त्यांच्याबाजूने उभा राहीन व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती सरकारची जबाबदारी असेल, असा इशारा विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे दिला. 
मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या आंदोलकांची दरेकर यांनी आज भेट घेतली, त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीपूर्वीच एसईबीसी गटातून नियुक्त झालेले पण नोकरी न मिळालेले मराठा उमेदवार उपोषणास बसले आहेत. मराठा उमेदवारांना आठ दिवसांत नोकरी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र आठ महिन्यांनंतरही ते पूर्ण झाले नसल्याची टीकाही दरेकर यांनी केली.
मराठा मोर्चासाठी मुंबईत निघालेल्या आंदोलकांना नवी मुंबई, नाशिक येथे अडविले जात आहे. परंतु अश्या प्रकारे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा तरुणांना रोखणे असंवैधानिक आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी या तरुणांना अडविले जाईल त्या ठिकाणी मी विरोधी पक्षनेता म्हणून उपस्थित राहीन. सरकारच्या दडपशाहीमुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली तर त्याची जबाबदारी सरकारची राहील, असेही दरेकर यांनी सुनावले.

Post a comment

0 Comments