वडोद बाजार : फुलंब्री तालुक्याच्या ग्रामीण भागातील वडोद बाजार येथील सोमवार आठवडी बाजारा सह गावागावात भरणार्या आठवडे बाजारात भाज्यांचे भाव गडगडले असून कोथंबीर रस्त्यावर आली आहे.
शेतकर्यांना भाज्या मातीमोल भावात विक्री करावा लागत आहे. तर सद्या केवळ बटाटे, कांदे तीस रूपये किलो दराने विक्री होत असल्यामुळे आज भाज्यांचा राजा म्हणून बटाटा पुढे आला आहे. तर कांद्याच्या भावा सारखा भाव बटाट्याला मिळत असल्यामुळे बटाटे अनेक वर्षानंतर महाग झाले आहेत. ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस पडला होता. तेव्हा शेतीच्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे डिसेंबर महिन्यात भाजीपाला महाग होईल, अशी अपेक्षा शेतकर्यांना होती.
मात्र सोयाबीन, मुग,उदिद, मका आणि खरीप हंगामातील पिके काढल्यावर सर्वच शेतकर्यांनी भाजीपाला लागवड केली. जे शेतकरी कधीच भाजीपाला करत नाही त्यांनी सुद्धा भाजीपाला लागवड केली. पिकांचे क्षेत्र वाढले शिवाय कांदा, बटाटा रोपांची टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतात काय लागवड करावी, असा प्रश्न निर्माण झाल्यावर शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाला लागवड केली.
भाजीपाल्याचे क्षेत्रात वाढ झाली त्याचा फटका आज नगदी पिकावर आला आहे. पालेभाज्या कोणत्याही घेतल्या तरी अवघ्या पाच रुपये इतकी स्वस्त जुडी मिळते, कोथंबीर, शेपू, मेथी, पालक 3 रुपये जुडी तर वेलवर्गीय पालेभाज्या अवघ्या 10 रुपये प्रति किलो दराने विकत आहे.
बटाटे आणि लसूण मात्र चांगला भाव खात आहे. हे दोन्ही पिके सध्या दुसर्या राज्यातून येत आहेत. आता येणारा सर्व बटाटा आणि लसूण दुसर्या भागातून येत असल्यामुळे स्थानिक शेतकर्यांचा सर्व शेती माल बेभावात विक्री होत आहे.
भाजीपाल्यातून खर्चही निघत नाही : भाजीपाला कवडीमोल भावात विकला जात आहे. त्यामुळे आठवडे बाजारात किरकोळ विक्री केल्यास चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र आठवडे बाजारात देखील भाजीपाला कवडीमोल भावात विक्री होत असल्यामुळे खर्च देखील वसूल होत नाही.
विठ्ठलराव साबळे, भाजी उत्पादक शेतकरी, गेवराई.
0 Comments