मानवी वस्तीत आलेल्या रानगव्याचा पुणेकरांच्या हुल्लडबाजीने घेतला जीव

पुणे: जंगलातून वाट चुकून माणसांच्या सिमेंटच्या जंगलात आलेल्या एका जखमी रानगव्याचा पुणेकरांच्या हुल्लडबाजीन जीव घेतला.७००ते८००किलो वजनाचा हा रानगवा अंदाजे ३ ते ४ वर्षाचा होता. नैसर्गिक अधिवास संपत आल्यानं मानवी वस्तीत आलेल्या या वन्यप्राण्यांना सहानुभूतीने वागणूक देण्याची आवश्यकता असते. पण हुल्लडबाजी करणाऱ्या अतिउत्साही नागरिकांमुळे आज एका रानगव्याला जीव गमवावा लागलाय.
सकाळी आठच्या सुमारास हा जखमी रानगवा कोथरूडच्या महात्मा सोसायटीच्या परिसरात आला. पहाटे फिरण्यासाठी आलेल्या लोकांनी हा विचित्र प्राणी पाहिला. त्यामुळे घाबरलेल्या लोकांनी अग्निशमन दल, पोलीस आणि वन खात्याला त्याची माहिती दिली. त्यामुळे या विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्याची माहिती पुणेकरांना कळताच पुणेकरांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दी केली. या गव्याची आज दिवसभर धरपकड सुरू होती. त्यामुळे लोकांची गर्दी वाढल्याने हा रानगवा बिथरला. त्यातच वनखाते आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे तो आणखीनच बिथरला. त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्धही केले. पण बिथरलेल्या या गव्याचा अखेर मृत्यू झाला.

Post a comment

0 Comments