माहेरी आलेल्या पत्नीनं पतीच्या टोक्यात घातलं दांडकं

पुणे : पती व पत्नी यांच्यात झालेल्या भांडणातून पत्नीनंच पतीचा निर्घृण खून केल्याच्या धक्कादायक घटनेनं पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात खळबळ उडली आहे. ओतूरजवळील डोमेवाडी येथे पत्नीनं दांडक्यानं केलेल्या बेदम मारहाणीत पतीचा मृत्यू झाला.
जयवंत चिमाजी शिंगोटे (वय-43, रा.खामुंडी, ता.जुन्नर, जि. पुणे) असं मृत व्यक्तीचं नाव असून छाया जयवंत शिंगोटे असं आरोपी महिलेचं नाव आहे.
मिळालेली माहिती अशी की, जयवंत चिमाजी शिंगोटे व त्यांची पत्नी छाया जयवंत शिंगोटे यांचे दहा दिवसांपूर्वी भांडण झालं होतं. त्यानंतर छाया शिंगोटे या माहेरी डोमेवाडी येथे निघून गेल्या होत्या. रविवारी छाया यांचे पती जयवंत डोमेवाडी येथे आले होते. त्या ठिकाणी त्यांचे पत्नीसोबत पुन्हा भांडण झालं. संतापलेल्या छाया यांनी पती जयवंत यास दांडक्यांनं बेदम मारहाण करुन जिवे ठार मारलं आणि बाजूला टाकून दिलं. त्यानंतर मयत जयवंत यांचा चुलतभाऊ उत्तम शिंगोटे यांना त्यांच्या पुतण्याने फोन करुन सांगितले की जयवंत निपचित पडला आहे. त्यानंतर उत्तम शिंगोटे हे डोमेवाडी येथे गेल्यानंतर त्यांना जयवंत शेतात निपचित पडल्याचं त्यांना दिसलं.
याबाबत त्यांनी जयवंत याच्या पत्नीकडे विचारणा केली असता पत्नीनं त्यांना कुणीतरी मारहाण करुन या ठिकाणी आणून टाकले असल्याचं सांगितलं. नंतर जयवंत यास प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्यानंतर उत्तम शिंगोटे यांनी याबाबत ओतूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पत्नी छाया हिस अटक करुन पोलिसी खाक्या दाखविला असता छाया हिने पतीचा खून केला असल्याची कबुली दिली.

Post a comment

0 Comments