औरंगाबाद घाटीत कोरोनाबाधित रुग्णाने केली तोडफोड, व्हिडिओ व्हायरल.

औरंगाबाद घाटीत कोरोनाबाधित रुग्णाने केली तोडफोड, व्हिडिओ व्हायरल.

रुग्णालयात तोडफोड करत डॉक्टरांनाही मारहाणीचा प्रयत्न केला.

औरंगाबाद - कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी औरंगाबादेत शासकीय रुग्णालय 'घाटी'मध्ये व्यवस्था केलेली आहे. शहरातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली असली तरी दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. 
राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसारच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहे. शहरातील घाटीत कोरोनाबाधित रुग्णांसाठी विशेष विभाग तयार करण्यात आला आहे. परंतु मला घरी जाऊ द्या, अशी मागणी करत एका कोरोनाबाधित रुग्णाने घाटीतच राडा घातला, आणि रुग्णालयात तोडफोड करत डॉक्टरांनाही मारहाणीचा प्रयत्न केला. रविवारी रात्री एका रुग्णाने घरी जाण्यासाठी रुग्णालयात तुफान राडा घातला. या रुग्णाने दुपारपासून घरी जावू देण्यासाठी डॉक्टरांकडे मागणी केली होती. परंतु उपचार पूर्ण झाल्याशिवाय डिस्चार्ज मिळणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले होते. तरीही या रुग्णाने घरी जाण्याचा तगादा लावूनच धरला. 

संध्याकाळी पुन्हा या रुग्णाने वैद्यकीय कर्मचाऱ्यांना घरी जाऊ देण्याची विनंती केली असता त्यांनीही त्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या रुग्णाने घाटीत तोडफोड करण्यास सुरुवात केली. कोरोना वार्डात त्याने तुफान राडा घातला आणि घरी जाण्यासाठी पळ काढू लागला. मात्र डॉक्टर आणि सुरक्षारक्षकांनी कोरोना वार्डाचे दार बाहेरून बंद करून घेतले. 

तरीदेखील हा रुग्ण ऐकण्यास तयार नव्हता. त्याने मुख्य दाराला लावलेल्या काचा देखील फोडल्या. हा रुग्ण तोडफोड करत असताना तो कोरोनाबाधित असल्याने त्याला पकडण्यासाठी कुणी पुढे सरसावत नव्हते. अखेर सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या कोरोनाबाधित रुग्णाला समज दिली. 

रुग्णाने केलेल्या तोडफोडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Post a comment

0 Comments