‌अन्यथा माणसांना प्राणवायुचे सिलेंडर सोबत ठेवावे लागेल - पाशा पटेल, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात बांबूची झाडे आणि पर्यायानावर मंथन.


औरंगाबाद, दि.१८ डिसेंबर :पृथ्वीवर माणूस प्राणवायू(ऑक्सीजन) घेतो आणि कार्बन सोडतो तर झाडे कार्बन घेऊन ऑक्सीजन देत असल्याने पर्यावरणाचा समतोल राखला जातो. मात्र मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने आणि जगाला वीस टक्के प्राणवायू (ऑक्सीजन) देणारे आफ्रिकेतील ऑमेझॉनचे जंगल जाळल्याने कार्बन एकदम दहा पीपीएमने वाढला आहे. हवेतील कार्बनचे प्रमाण साडेचारशे पीपीएम झाले तर पृथ्वीवरील जीव सृष्टीच नष्ट होण्याचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे इतर झाडांपेक्षा तीस टक्के अधिक कार्बन शोषूण घेणा-या बांबूची लागवड करुन गावागावात कार्बनचे गोडाऊन उभे करावे लागतील. अन्यथा काही वर्षांनी माणसाला मुखपट्टीबरोबर प्राणवायुचे सिलेंडर घेऊन फिरण्याची वेळ येईल , असा इशारा माजी आमदार पाशा पटेल यांनी दिला. बांबूची शेती फायद्याची असल्याने ती लोकचळवळ व्हावी यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
 औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या विभागीय कार्यालयात वार्तालापमध्ये माजी आ. पाशा पटेल यांनी पर्यावरणात असमतोल निर्माण झाल्याने भविष्यातील धोके आणि त्यावरील उपायाबाबत सविस्तर चर्चा केली. 
         शरीरात तापमान वाढले आणि प्राणवायु (ऑक्सीजन) कमी झाला की करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होते. याच पध्दतीने पृथ्वीचेही तापमान वाढल्यामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होणार असल्याची चाहूल लागली आहे. जगाला वीस टक्के ऑक्सीजनचा पुरवठा करणार्‍या आफ्रिकेतील ऑमेझॉन जंगल जाळल्यामुळे हवेतील कार्बनचे प्रमाण दहा पीपीएमने वाढून 422 पीपीएम झाले. कार्बनचे प्रमाण साडेचारशे झाले तर पृथ्वीवरील जीव सृष्टीलाच धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे काही वर्षांनी मुखपट्टी (मास्क) बरोबरच प्राणवायुचे सिलेंडरही सोबत घेऊन फिरण्याची वेळ मानवावर येणार आहे. मनुष्य प्राणी ऑक्सीजन घेतो, कार्बन सोडतो. तर झाडे कार्बन घेऊन ऑक्सीजन देत असल्याने पर्यावरणाचा समतोल राहण्याची व्यवस्था आहे. मात्र काही वर्षांपासुन वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात झाल्याने समतोल ढासळला. वड आणि पिंपळाचे झाड सर्वाधिक ऑक्सीजन देतात. पण या झाडांची संख्याही आता खूप कमी झाल्याने तापमान ही वाढले आहे. जागतिक पातळीवर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अनेक देशांनी आता डिझेल आणि पेट्रोलवरील वाहने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
               भारतातही चार चाकी गाड्यांना युरो सिक्स चे इंजिन वापरण्याचे बंधनकारक करण्यात आले असुन इथेनॉल आणि सीएनजी चा वापर वाढवण्याकडे सरकारचे धोरण आहे. हवेतील वाढलेले कार्बनचे प्रमाण कमी करुन ऑक्सीजनचे प्रमाण वाढवण्यासाठी वड आणि पिंपळाची झाडे लावली तरी ती मोठी होण्यासाठी वीस ते पंचवीस वर्ष लागतात. त्यामुळे बांबूचे झाड हे रोज एक फुट वाढत असल्याने चारच वर्षात मोठे होते. तर इतर झाडांपेक्षा तीस टक्क्यांनी अधिक कार्बनचे शोषण करते. त्यामुळे गावागावात बांबू चे बाग उभे करुन कार्बन शोषून घेणारी गोडाऊन उभा केले तरच जीव सृष्टीवरील धोका टळणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मराठवाड्यातील गोदावरी आणि मांजरा नदीच्या काठावर बांबूची लागवड करण्यासाठी आणि गावागावात बांबूची शेती व्हावी यासाठी आता लोकचळवळ होणे आवश्यक आहे. यासाठी आपण या विषयावर जनजागृती करत असल्याचे माजी आ. पाशा पटेल यांनी सांगितले. 

 बांबूपासून अठराशे वस्तू-पाशा पटेल
 माणसाला वर्षाला 280 किलो ऑक्सीजन लागतो. तर बांबूचे एक झाड वर्षाला 320 किलो ऑक्सीजन देते आणि इतर पिकांपेक्षा एक एकर मध्ये वर्षाला जवळपास एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. बांबूपासून कागद, दैनंदिन वापरातील उपकरणे, खाण्याच्या बिस्कीटापासून इंधन आणि इमारत बांधण्यापर्यंत आणि ताट, वाटीपासून ते टुथब्रश पर्यंत अठराशे वस्तू तयार होत असल्याने बांबूला मोठी मागणी वाढली आहे. 
कोळश्यापासून वीज तयार करणे आता बंद होणार असल्याने बांबूपासून वीज निर्मितीचेही प्रयोग सुरू आहेत. चीन आणि जपान मध्ये बांबूच्या शेतीला प्राधान्य असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आता बांबूला गवताच्या व्याख्येत आणल्याने ते तोडण्यासाठी परवानगीची गरज नाही. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील पहिले खाजगी बांबू इंजिनिअरींग महाविद्यालय लोदगा (जि.लातूर) येथे सुरू करण्यात आले असल्याचे माजी आ.पाशा पटेल यांनी सांगितले.   
             वार्तालाप कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाशा पटेल यांचे स्वागत पत्रकार संतोष देशमुख यांनी तर यज्ञवीर कवडे यांचे स्वागत दत्ता शहाणे यांनी केले.यावेळी संपादक, रविंद्र तहकीक,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ.प्रभू गोरे, संघटक विलास शिंगी, कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा, जिल्हा उपाध्यक्ष छबुराव ताके, सरचिटणीस नारायण जाधव पाटील, सचिव दिपक मस्के, प्रसिद्धी प्रमुख मनोज पाटणी,जान भालेराव, सचिन अंभोरे,गणेश पवार,रवि वैद्य, निलम कांबळे,सिधि घायाळ, जगन्नाथ सुपेकर, अतिष शेजवळ आदींसह विविध माध्यमांच्या ४२ प्रतिनिधींची उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments