तूर पिकावर अळीसह दाट धुक्याचे संकट औंढा तालुक्यातील शेतकरी धास्तावले.

तूर पिकावर अळीसह दाट धुक्याचे संकट औंढा तालुक्यातील शेतकरी धास्तावले.

औंढा नागनाथ : तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढवली होती. त्या पाठोपाठ तुरीवर अळीने हल्ला सुरू केला असून दाट धुक्यामुळे तुरीचे पीक संकटात आले असून यंदा तुरीच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
पावसामुळे खरीप हंगामाचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात असताना वातावरणाच्या बदलामुळे धुके पडत आहे. त्यामुळे तुरीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव व फुलगळती होऊ लागली आहे. ती रोखण्यासाठी शेतकरी रासायनिक औषधांची फवारणी करत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर नवे संकट निर्माण झाले आहे .परतीच्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले खरीप पिके हातची गेली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा तुरीवर होत्या . मात्र गेल्या काही दिवसापासून पहाटेच्यावेळी धुके पडत आहेत. 

परिणामी तुरीची फुलगळ होत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. सध्या तूर फुलोर्‍यात असून काही ठिकाणी तुरीच्या पानांवर अळीने हल्ला चढविल्याचे दिसून येत आहे.अगोदरच अतिवृष्टीमुळे सखल जमिनीत साचलेल्या पाण्यामुळे तुरीची फुले गळाली आहेत. पाणी साचले नाही तेथील तूर चांगली मात्र अळीच्या प्रादुर्भावाने संकट निर्माण झाले आहे. जवळपास चाळीस टक्के असल्याचे शेतकर्‍यांतून सांगण्यात येत आहे. 

एकीकडे रब्बीच्या हंगामाच्या पेरणीच्या कामात शेतकरी असताना दुसरीकडे तुरीचे संकट निर्माण झाले आहे. वास्तविक पाहता अतिवृष्टीने सोयाबीन कापूस मूग उडीद पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे खरिपातील हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे.वातावरणातील बदलामुळे आता पहाटेच्या वेळी मोठ्या प्रमाणात धुके दाटत असल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Post a comment

0 Comments