जो मला धमकी देतो त्याला मी सोडत नाही, मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय - संजय राऊतमुंबई, दि. २९ डिसेंबर :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीनं नोटिस बजावली. त्यानंतर त्यांना आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे देण्यात आले होते. मात्र चौकशीला सामोरं जाण्यासाठी आपल्याला अधिकचा वेळ हवा असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान पत्नीला आलेल्या ईडी नोटिशीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला आहे. 
मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल, तो राहणार नसल्याचा इशारा राऊतांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला आहे. तसंच ईडीकडे ५ जानेवारीपर्यंत वेळ मागितला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
मी अद्याप नोटीस पाहिलेली नाही. नोटीस माझ्या नावावर नाही. मला नोटीस पाहण्याची गरज नाही. हे सगळं राजकारण कसं चालतं मला माहिती आहे, त्यामुळे हे सुरु राहू दे आम्ही उत्तर देऊ, असंही त्यांनी सांगितलं. ईडी ही सरकारी संस्था आहे. सरकारी कागदपत्रांकडे कानाडोळा करु शकत नाही, भले कायद्यावर कोणाचाही दबाव असला, तरी आम्ही कायदे मानतो. कायद्यांचं पालन करतो, असंही बोलायला राऊत विसरले नाहीत. 
हे राजकारण कसं सुरु आहे, ते मला माहिती आहे, ते चालू द्या, मला त्यात पडायचं नाही, असं म्हणत देशात आजही कायदा असून त्याचा सन्मान केला पाहिजे. देशात सध्या इतर कोणतीही मोठी गोष्ट नाही. मी १२० जणांची यादी दिल्यानंतर कदातिच ईडीकडे खूप काम येईल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

Post a comment

0 Comments