आता बडे थकबाकीदार मनपाच्या रडारवर.कर वसुली आढावा : व्यावसायिक मालमत्ताधारकांना प्राधान्य.

आता बडे थकबाकीदार मनपाच्या रडारवर
कर वसुली आढावा : व्यावसायिक मालमत्ताधारकांना प्राधान्य.

औरंगाबाद : महापालिकेने आता मालमत्ता कराच्या वसुलीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. प्रामुख्याने बडे थकबाकीदार व व्यावसायिक मालमत्ता पालिकेच्या रडारवर असून यांकडून वसुली करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. जे थकबाकी भरणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा बडगा आगामी दिवसांत पालिकेकडून उगारला जाणार आहे.
नवनियुक्त कर निर्धारक व संकलन अधिकारी तथा उपायुक्त अपर्णा थेटे यांनी पदभार स्विकारताच मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेतला. एक लाखापेक्षा अधिक कराची थकबाकी असलेल्या व्यावसायिक मालमत्ताधारकांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे, असे त्यांनी माहिती देताना सांगितले. पालिकेने मार्च महिन्यापासून कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. त्यामुळे मालमत्ता कराच्या वसुलीचे काम तब्बल सात महिने थांबवले. कोरोनाच्या काळात मालमत्ताधारकांना विनाकारण त्रास दिला जावू नये, अशी भुमिका पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी घेतली होती. ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे प्रशासकांनी मालमत्ता कर वसुलीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला प्रभाग कार्यालयाकडून मालमत्ताधारकांना कराचे मागणीपत्र पाठविण्याचा निर्णय घेतला. मिशन बिगेन अगेनअंतर्गत सर्व व्यवहार सुरु झाल्यानंतर प्रभाग कार्यालयांना कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले. प्रभारी मालमत्ता कर संकलन व निर्धारक अधिकारी म्हणून कार्यरत असलेले नंदकुमार भोंबे यांच्याकडे अनेक पदभार आहे. त्यामुळे त्यांच्याकडील मालमत्ता कर संकलन व निर्धारक अधिकारी पदभार काढून घेत हा पदभार उपायुक्त अपर्णा थेटे यांच्याकडे नुकताच सोपवला आहे. थेटे यांनी रूजू होताच कामाला सुरूवात केली आहे.


बड्या थकबाकीदारांच्या वसुलीला प्राधान्य :- 
प्रभारी मालमत्ता कर संकलन व निर्धारक अधिकारी म्हणून अपर्णा थेटे यांनी पदभार स्विकारल्यानंतर प्रभाग अधिकार्‍यांकडून आढावा घेतला. एक लाखापेक्षा अधिक कराची थकबाकी असलेल्या व्यावसायिक मालमत्ताधारकांकडील थकीत कर वसुलीला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कर वसुलीसाठी सुक्ष्म नियोजन केले असून त्यास पालिका आयुक्तांची मान्यता मिळताच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे अपर्णा थेटे यांनी गुरूवारी दि.3 स्पष्ट केले.

दुबार नोंदी वगळण्याचे काम हाती घेणार : - मालमत्ता कराच्या दुबार नोंदीमुळे मालमत्ता कराचा आकडा वाढलेला आहे. त्यामुळे कर वसुलीत देखील अडचणी येत आहे. दुबार नोंदी वगळण्याचे काम हाती घेतले जाणार असून या नोंदी वगळल्यानंतर मालमत्ताधारकांकडून कर वसुली केली जाणार आहे.

Post a comment

0 Comments