पोटदुखीचे कारण सांगून कारागृहातील कैदी घाटीतून पसार.

पोटदुखीचे कारण सांगून कारागृहातील कैदी घाटीतून पसार.

वडिलांच्या खुनासह, विनयभंग, पोस्कोसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी.

औरंगाबाद : पोट दुखीचे कारण पुढे करुन घाटीत उपचारासाठी दाखल झालेल्या अट्टल गुन्हेगाराने वार्ड क्रमांक 18 मधून कारागृह पोलिसांसमोर पळून गेला. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. किशोर विलास आव्हाड (23, रा. राजनगर, मुकुंदवाडी) असे गुन्हेगाराचे नाव आहे. विनयभंग, पोस्कोच्या गुन्ह्यामध्ये किशोर आव्हाड याला न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली होती. 
फेब्रुवारी 2020 मध्ये त्याला शिक्षा लागल्यापासून तो हर्सुल कारागृहात होता. 4 डिसेंबर रोजी त्याने कारागृह अधिका-यांना प्रकृती बिघडल्याचे सांगितले. ताप येऊन पोटदुखीचा त्रास होत असल्याची तक्रार केल्याने त्याला घाटीच्या वॉर्ड क्रमांक 18 मध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या सुरक्षेसाठी कारागृहाचे पोलिस देखील तैनात करण्यात आले होते. 

मात्र, कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष होताच त्याने तोंडाला रुमाल बांधून हातात पाण्याची बाटली घेत पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांनी घटनास्थळी भेट दिली. तेथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांंच्या फुटेजची पाहणी करण्यात आली.

गोंदवलेल्या अक्षरावून लागला होता शोध : 25 मार्च 2019 रोजी एमआयडीसी वाळुज भागातील एक महिला तिच्या लहान मुलीसह शहानुरमिया दर्गा परिसरात भाजीपाला खरेदीसाठी गेली होती. त्यावेळी त्यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने किशोरने दोघींना निर्मनुष्य परिसरात नेत बलात्काराचा प्रयत्न केला होता. याप्रकरणात तपास करत असताना पोलिसांना लहान मुलीने त्याच्या एका हातावर ‘सुरेखा’ असे मराठीत तर त्याच हाताच्या अंगठ्यावर ‘के’ असे इंग्रजीत गोंदलेले आहे असे सांगितले होते. 

त्या वर्णनावरुन जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या सहायक निरीक्षक श्रध्दा वायदंडे यांनी 10 एप्रिल रोजी राजनगरमधून अटक केली होती. याप्रकरणात किशोर आव्हाडला दहा महिन्यातच आरोप सिध्द होऊन शिक्षा देखील लागली होती.

Post a comment

0 Comments