बीड हादरले ! एक जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी.

बीड, दि. १८ डिसेंबर : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिजामाता चौकातील एका दुकानात केमिकल कॅनचा भीषण स्फोट होऊन एक जण जागीच ठार झाला तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि १८ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. अनिरुद्ध सर्जेराव पांचाळ असे मृताचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहंचले असून तपासणी सुरू आहे. या घटनेमुळे शहरात मात्र एकच खळबळ उडाली आहे.
    शहरातील मोंढा रोडवर अनिरुद्ध सर्जेराव पांचाळ (३२, रा. सेलू, ता. गेवराई) यांचे चंपावती हार्डवेअर नावाचे दुकान आहे. त्यांचे गोदाम मसरतनगर भागात होते. या गोदामात हा स्फोट झाला आहे. सामान घेण्यासाठी या गोदामात एक ट्रॉली आली होती. त्या ट्रॉलीत काही सामान भरले होते. दरम्यान केमिकलची कॅन उघडून पाहत असताना हा भीषण स्फोट झाला. यावेळी दुकानात तिघे जण उपस्थित होते. स्फोटाच्या हादऱ्याने अनिरुद्ध पांचाळ हे दुकानाबाहेर फेकल्या गेले यातच त्यांचा मृत्यू झाला. कॅनचे तुकडे तुकडे होऊन लांबवर विखुरल्या गेले. कॅनमधील केमिकल हे खूप जुने होते. जास्त जुने केमिकल ठेवल्यामुळे आणि झाकण उघडताच हा स्फोट झाला आहे. इतर दोघेही गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Post a comment

0 Comments