'आज शेतकरी का रस्त्यावर उतरला त्यावर बोला'संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारले.

'आज शेतकरी का रस्त्यावर उतरला त्यावर बोला'
संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारले.

मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत त्यांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला होता. भारत बंदला पाठिंबा देण्यावरून भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये वाद पेटला आहे.

'जर उत्खनन करायचे ठरवले तर खूप लांब जाता येईल, आज शेतकरी का रस्त्यावर उतरला त्यावर बोला' असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फटकारले आहे. 
मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भारत बंदला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'मी संपूर्ण देशातून माहिती घेतली. जिथे भाजपाचे सरकार आहे, तिथेही चांगल्या प्रकारे बंदला प्रतिसाद मिळतोय. हा भारत बंद राजकीय नाही. 

हा बंद शेतकऱ्यांच्या भावनांना पाठिंबा देण्यासाठी आहे. ज्याच्या कष्टाचे अन्न आपण खातोय, त्याला पाठिंबा देण्यासाठी हा बंद आहे. त्यामुळे आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहायला हवे. मागील १२ दिवस थंडी, वाऱ्याची, सरकारी दडपशाहीची पर्वा न करता दिल्लीच्या सीमेवर संघर्ष करतोय त्याला पाठिंबा देणे हे देशातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.' अस मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. संजय राऊत पुढे म्हणाले, 'आता हे उत्खनन करायचे म्हटले तर खूप लांबपर्यंत जाईल. आज देशात काय सुरु आहे. १० वर्षापूर्वीचे बोलू नका. 

शेतकरी आज रस्त्यावर आहे, त्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेसने आवाहन केलेले नाही. जो शेतकरी रस्त्यावर उतरला आहे त्याला कोणतेही राजकीय पाठबळ नाही, हे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याने समजून घेतले पाहिजे. त्याच्या हातात कोणताही राजकीय झेंडा नाही. त्यामुळे आपण विरोधी पक्षनेते म्हणून आपण काय भूमिका मांडत आहोत. याचा त्यांनी विचार केला पाहिजे. 

आज शेतकरी रस्त्यावर आहे, आज तो स्वत:च्या छातीवर गोळ्या झेलण्यास का तयार झाला आहे याचा राजकीय मतभेद बाजूला ठेवून शांत डोक्याने विचार केला तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील याची खात्री आहे. 

दबावात येण्याची गरज नाही. सरकारकडे डोके नाही पण जर त्यांनी मनाने विचार केला तर या देशाच्या शेतकऱ्याचे ऐकायला हवे, शेतकऱ्याचे ऐकले तर संपूर्ण जग आपले ऐकेल.'

यावेळी राऊत यांनी, लोकसभेत जेव्हा कृषी विधेयक सादर करण्यात आले होते. त्यावेली आम्ही पाठिंबा दिला नव्हता, असेही स्पष्ट केले. पुढे ते म्हणाले, 'शरद पवार राष्ट्रपतींना भेटून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार आहेत. 

राष्ट्रपतींना अधिकार असतील तर ते प्रश्न सोडवतील. शिवसेनेच्या नेत्यांना दिल्लीत जाऊन कोणाला भेटायची गरज नाही, शरद पवार भेटत आहेत, ते महाराष्ट्राचीच भूमिका मांडतील.'

Post a comment

0 Comments