राज्यात लसीकरणासाठी तयारी सुरु, समितीही गठीत - राजेश टोपे.

राज्यात लसीकरणासाठी तयारी सुरु, समितीही गठीत - राजेश टोपे.

राज्यात लसीकरणासाठी मुख्य सचिवांच्या स्तरावर एक समिती स्थापन.

मुंबई - कोरोना लस निर्मिती केंद्रांच्या वतीने लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्राकडे परवानगी मागण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता लसीकरणासाठी राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. 

राज्यात लसीकरणासाठी मुख्य सचिवांच्या स्तरावर एक समिती स्थापन केल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोना लसीकरणाचे काम मोठे आहे. त्यात वाहतूक, शितगृह आणि प्रशिक्षणाचा समावेश आहे. राज्यात शितगृहासंदर्भात काही उणिवा आहेत. त्यासंदर्भात डिसेंबर-जानेवारीपर्यंत यंत्रणा पूरवू, अशी माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. 
आम्ही सर्व आकडेवारी केंद्राला दिली आहे. आता आम्ही केंद्र सरकार यंत्रणा कधी पुरवणार याची वाट पाहतोय, अशी माहिती टोपेंनी दिली. कोरोना लसीवर एकूण 5 कंपन्या काम करत आहेत. त्यांचे क्लिनिकल ट्रायलही पूर्ण झाले आहेत. आता कोणत्या राज्यात कोणत्या कंपनीला परवानगी द्यायची हे केंद्र ठरवणार आहे. 

लसीकरणासाठी राज्यात एक की दोन कंपन्यांना परवानगी द्यायची हा देखील अधिकार केंद्र सरकारचा आहे, असे टोपे म्हणाले. कोरोना लस आल्यानंतर सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना लस दिली जाईल, असे टोपे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. मंगळवारपर्यंत 90 हजार जणांची यादी तयार झाली असून आयएमएच्या माध्यमातून माहिती गोळा केली जात असल्याचे टोपेंनी सांगितले. 

लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाला आजपासून सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने आखून दिलेल्या सर्व वेळा आम्ही पाळत आहोत. 

राज्यात कोरोना चाचण्याचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ते गरजेचे आहे. सूपर स्प्रेडर्सच्या चाचण्यांवर जास्त भर देत आहोत. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये आणि आली तरी त्याला सामोरे जाता यावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत, असेही टोपेंनी स्पष्ट केले आहे.

Post a comment

0 Comments