शहराच्या ब्रॅन्डिंगवरुन तापले राजकारण!! लव औरंगाबाद v/s सुपर संभाजीनगर.

औरंगाबाद : शहरात पर्यटन वाढीस लागावे आणि नव्या पिढीला शहराचा इतिहास समजावा यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाने ऐतिहासिक शहराचे ब्रँडिंग सुरू केली आहे. यासाठी शहरात ‘लव्ह औरंगाबाद’ चे डिस्ल्पे लाऊन तेथे सेल्फि पॉइंट तयार केले आहेत. तर या प्रशासनाच्या या अभिनव योजनेला ‘सुपर संभाजीनगर’ चे डिस्प्ले लाऊन प्रत्युत्तर दिले आहे. महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुपर संभाजीनगरचे डिस्प्ले चर्चेचा विषय ठरत आहे.
महापालिकेने ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे ब्रँडिंग करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा आधार घेत शहरात अभिनव उपक्रम राबवला आहे. त्यासाठी महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेतला आहे. औरंगाबाद शहराचे मुळ नाव खडकी असे होते, नंतर ते औरंगाबाद करण्यात आले. औरंगाबादच्या जवळच पैठण आहे. पैठण शहर पूर्वी प्रतिष्ठाननगरी या नावाने ओळखले जात होते. औरंगाबाद शहर व परिसराचा इतिहास स्थानिक नागरिकांना कळावा, शहराच्या नावातील संदर्भ लक्षात यावा या उद्देशाने लव्ह औरंगाबाद मोहीम राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
या मोहिमेतून औरंगाबाद शहराचे ब्रँडिंग होईल आणि नागरिकांमध्ये पर्यटकांना या ऐतिहासिक शहराबद्दल माहिती जाणून घेण्याची इच्छा -जिज्ञासा निर्माण होईल या अपेक्षेने प्रशासनाने सिडको एन- १ पोलीस चौकीच्या शेजारी असलेल्या पिरॅमिड जवळ ‘लव्ह औरंगाबाद ' चा डिस्प्ले लावला. हा डिस्प्ले सेल्फी पॉइंट म्हणून विकसीत करण्यात आला आहे. त्याच बरोबर जालना रोडवर हायकोर्टाच्या जवळ ग्रीनबेल्ट मध्ये ‘लव्ह प्रतिष्ठान’ चा तर खडकेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात ‘लव्ह खडकी’ या नावाने डिस्प्ले लावण्यात आला आहे. हे सर्व पॉइंट सेल्फी पॉइंट आहेत.
औरंगाबाद शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादला ‘सुपर औरंगाबाद’ करण्याची घोषणा केली. विकास कामे सुरु झाली आहेत, ती आता थांबणार नाहीत असे ते म्हणाले. पालकमंत्र्यांच्या भाषणातील हाच धागा पकडून मातृभूमी प्रतिष्ठान या संस्थेने टिव्ही सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या जवळ ‘सुपर संभाजीनगर’ या नावाचा डिस्प्ले लावला आहे. दुसरा डिस्प्ले क्रांतीचौकात लावला जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेसह विविध विकास कामांचे भूमिपूजन झाल्यावर महापालिका निवडणुकीची चर्चा अधिक गांभीर्याने सुरु झाली आहे. त्यातच सुपर संभाजीनगर या नावाचे डिस्प्ले लागल्यामुळे या चर्चेला अधिकच धार चढली आहे. ‘लव्ह औरंगाबाद’ च्या तुलनेत ‘सुपर संभाजीनगर’ चर्चेचा विषय ठरु लागल्यामुळे सुपर संभाजीनगरने लव्ह औरंगाबादला प्रतिउत्तर दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मातृभूमी प्रतिष्ठानचा मी अध्यक्ष आहे. अध्यक्ष या नात्याने शहरात सुपर संभाजीनगर या नावाचे डिस्प्ले लावण्यासाठी मी महापालिका प्रशासनाकडे परवानगी मागीतली आहे. दहा ठिकाणे यासाठी मी दिली आहेत, त्यापैकी क्रांतीचौक आणि टिव्ही सेंटर चौक या दोन ठिकाणची परवानगी मिळाली आहे. मनपाने पुर्वीच ठरावही घेतलेला आहे. जनतेच्या भावना लक्षात घेऊन सुपर संभाजीनगरचा उपक्रम हाती घेतला आहे.
 अंबादास दानवे (आमदार तथा जिल्हाप्रमुख शिवसेना)
शहराचे नाव कायदेशीरदृष्ट्या औरंगाबाद आहे, आणि तेच नाव सर्वांना घ्यावे लागेल. हे नाव बदलता येणार नाही. एखादी संस्था संभाजीनगर नावाने काही करीत असेल तर तो त्या संस्थेचा अंतर्गत विषय आहे.
मुश्ताक अहेमद ( संभाजीनगर नावाबद्दलचे याचिकाकर्ते)

Post a comment

0 Comments