कॉल गर्ल म्हणून शौचालयात लिहिला महिला प्राध्यापकाचा फोन नंबर

मुंबई : सार्वजनिक शौचालयात महिला प्राध्यापिकेचा क्रमांक कॉल गर्ल म्हणून लिहिल्यामुळे त्यांना त्रासाला सामोरे जावे लागले. याप्रकरणी वारंवार फोन करणाऱ्या दोघांना वडाळा पोलिसांनी नुकतीच अटक केली. 
सूरज सिद्धार्थ कांबळे (वय २५), मनोज लक्ष्मण देवरुखकर (३१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. सूरज नवी मुंबईतील घणसोली व मनोज उल्हासनगर येथील रहिवासी आहे. तक्रारदार खासगी महाविद्यालयात प्राध्यापक असून, नवी मुंबई येथील रहिवासी आहे. नवी मुंबईतील जुईनगर येथील सार्वजनिक शौचालयात तक्रारदाराचा क्रमांक कॉल गर्ल म्हणून लिहिण्यात आला होता. तो पाहून सूरजने त्यांना दूरध्वनी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबतची माहिती सूरजने मनोजला दिली. दोघांनीही दूरध्वनी करण्यास सुरुवात केली. ३० डिसेंबर २०२० पासून त्यांना शरीरसुखाची मागणी करणारे दूरध्वनी येण्यास सुरुवात झाली. एका आरोपीने त्यांना स्वतःचा दूरध्वनी पाठवून त्यांच्याकडे छायाचित्राची मागणी केली.
आठवडाभर दोन्ही आरोपींकडून खूप त्रास झाल्यानंतर त्यांनी अखेर 7 जानेवारीला याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. सुरुवातीला तक्रारदारांना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा यात सहभाग असल्याचा संशय होता; पण तपासात तसे आढळले नाही. दोन्ही आरोपी ऍप्लिकेशनद्वारे इंटरनेट दूरध्वनी करत होते. इतरवेळी त्यांचे मोबाईल बंद असायचे. अखेर तक्रारदार महिलेच्या मदतीनेच आरोपींना गळ घालण्याचे पोलिसांनी ठरवले. त्यानुसार दूरध्वनी आल्यानंतर तक्रारदार महिलेने आरोपींना हॉटेलमध्ये जाऊया, असे सांगितले. त्या आमिषाला बळी पडून सूरज तेथे आला. त्यानुसार त्याला सापळा रचून पोलिसांनी 8 जानेवारीला अटक केली. त्यानंतर त्याच्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरून मनोजला पोलिसांनी अटक केली. दोघांचेही मोबाईल जप्त केले असून, ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Post a comment

0 Comments