औरंगाबादच्या नामांतरला काँग्रेस विरोध करत आहे आणि शिवसेना स्पष्ट मत मांडत नाही - प्रविण दरेकर

पुणे,दि. ०४ जानेवारी :   ''औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्यास महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसचा विरोध आहे. याबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट दिसत नाही. सरकार महत्त्वाचे आहे की अस्मिता महत्त्वाची, याबाबत पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट करावी,'' अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी केली. 
पुणे शहरात कार्यक्रमासाठी आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार योगेश टिळेकर, नगरसेवक दीपक पोटे, राजेश येनपुरे, संदीप खर्डेकर उपस्थित होते.
औरंगाबादचे नामांतर, ईडी प्रकरण, मराठा आरक्षण आदी विषयांवरून दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ""कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामकरणाला विरोध केला आहे. संजय निरुपम सांगत आहेत की, सरकार आमच्यामुळेच आहे. तर अशोक चव्हाण म्हणतात की, हा विषय आमच्या अजेंड्यावर नव्हता. मग यावर शिवसेना आपली भूमिका स्पष्ट का करत नाही.'' 
"ईडी' विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याच्या मुद्यावर बोलताना दरेकर म्हणाले, ""ईडी' ही स्वायत्त संस्था असून तिच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणे म्हणजे लोकशाहीच्या विरोधात काम करण्यासारखे आहे. अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न घातक आहे.'' एकनाथ खडसे म्हणाले होते, माझ्यामागे "ईडी' लावली, तर मी "सीडी' काढतो. सध्या ते सीडी शोधताय, अशी टीपण्णी दरेकर यांनी केली. 
माझीसुद्धा चौकशी करावी 
विरोधक बॅंकेसंदर्भात दरेकर यांची चौकशी करण्याची मागणी करत आहे. याबाबत विचारला असता दरेकर म्हणाले, ""मी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. मी चौकशीला घाबरत नाही. माझी तत्काळ चौकशी करावी.'' 

दरेकर म्हणाले... 
* पुणे शहर भाजपमध्ये गटबाजी नाही 
* शहराचे नाव बदलून काहीही साध्य होत नाही. 
* नाव बदलण्यासंदर्भात भाजपची भूमिका पक्षश्रेष्ठी जाहीर करतील 
* आमच्या सरकारच्या काळात नामकरणाचा प्रस्ताव आला नव्हता. 

Post a comment

0 Comments