हिंजवडी मध्ये जुन्या विरुद्ध नवे उमेदवार लढवणार निवडणूक

पुणे : महाराष्ट्रातील १४ हजार २३२ गावातील ग्रामपंचायत निवडणुका लागल्या आहेत. ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. राज्यातील गावांगावांमध्ये ग्रामंपचायत निवडणुकांचा फिव्हर चढला आहे. पुण्यातील आयटी नगरी हिंजवडी ग्रामपंचायतीमध्येही निवडणूक लागलीय. इथं सत्ताधाऱ्यांविरोधात युवकांनी दंड थोपटले आहेत. हिंजवडीमध्ये जुने विरुद्ध नवे असा सामना रंगला आहे. 
दहा ते पंधरा वर्षे सत्तेत राहूनही पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या सत्ताधारी गटाविरुद्ध युवकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. यंदा होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी नवे विरुद्ध जुने असा थेट सामना पाहायला मिळतोय. हीच परिस्थिती आयटीनगरीमध्ये पाहायला मिळणार आहे. आयटी नगरीतील प्रमुख माण, हिंजवडी, मारुंजी, कासारसाई अशा अनेक गावात यंदा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये युवकांनी उमेदवारी अर्ज दाखल करून मोठे आव्हान निर्माण केले आहे.त्यामुळे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी जुने विरुद्ध नवे सामना करणार असल्याचे चित्र पंचक्रोशीत दिसत आहे.

Post a comment

0 Comments