कुठून आला बर्ड फ्लू ? कितपत आहे धोका ? प्रसार कसा होतो? जाणुन घेऊ !!!

नवी दिल्ली : कोरोनानंतर आता देशात बर्ड फ्लूचा हाहाकार दिसून येतोय. केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यानंतर आता महाराष्ट्रात हाय अलर्ट आहे. कावळा तसेच इतर अनेक स्थलांतर करणाऱ्या पक्षांच्या मृत्यूनंतर अनेक राज्यात व्हायरसच्या चाचणीसाठी नमूने पाठवण्यात आले आहेत. काय आहे हा रोग? कोरोनानंतर आता या विषाणूचा धोका आहे का? तोवर चिकन-अंडी खाणं सुरक्षित आहे ना? या साऱ्याविषयीच आपण माहिती घेणार आहोत. बर्ड फ्लूमुळे अर्थातच चिंतेचे वातावरण पसरले असून पोल्ट्री इंडस्ट्रीला याचा फटका बसला आहे. अनेक लोकांनी चिकन आणि अंडी खाणे बंद केल्यामुळे त्यांचे भाव रसातळाला जात आहेत. 

काय आहे हा रोग?
बर्ड फ्लू अथवा ज्याला एव्हीयन इन्फ्लूएंझा असं म्हटलं जातं हा रोग बहुतांश वेळेला पक्ष्यांमध्ये आढळतो. मात्र, इतर प्राणी तसेच माणसांना संक्रमित करण्याची क्षमता या विषाणूमध्ये निश्चितच आहे. पक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर मारणाऱ्या विषाणूचा H5N1 हा स्ट्रेन कॉमन आहे. अर्थातच कोरोनामुळे आता तुम्हाला विषाणू, त्याचा स्ट्रेन, त्याचा प्रकार या सामान्य बाबी आता समजल्याच असतील. जसा कोरोनाचा नवा स्ट्रेन सध्या धुमाकूळ घालतो आहे, अगदी तसेच बर्ड फ्लूच्या विषाणूचे देखील इतर अनेक स्ट्रेन आहेत. जसे की H5N7 आणि H5N8 असे... आणि हेदेखील संसर्गजन्य तसेच जीवघेणे आहेत... हा व्हायरस सर्वांत आधी गीस या पक्ष्यामध्ये आढळला... तो सुद्धा चीनमध्ये... चीन ही विषाणूंची जननी आहे.. असं छातीठोकपणे म्हणायला आता काही हरकतच उरली नाहीये... आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा विषाणू आणि हा रोग जगभरात सापडत गेला. भारतामध्ये हा विषाणू पहिल्यांदा महाराष्ट्रात सापडला होता. 2006 मध्ये नंदूरबारमध्ये याची पक्ष्यांना लागण झाली होती. सध्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये आढळलेल्या पक्ष्यांच्या शरिरामध्ये H5N8 हा स्ट्रेन सापडला आहे तर हिमाचल प्रदेशातील  पक्ष्यांच्या चाचणीमध्ये H5N1 हा विषाणू सापडला आहे. 

माणसांमध्ये संक्रमण शक्यय का?
बर्ड फ्लूचा H5N1 हा विषाणू पक्ष्यांच्या संपर्कातून माणसांमध्ये प्रवेश करु शकतो. जगात याप्रकारची केस सर्वांत आधी अर्थातच चीनमध्ये आढळली होती. 1997 मध्ये हाँगकाँगमध्ये बर्ड फ्लूने संक्रमित पहिला माणूस सापडला होता. हा पोल्ट्री फार्ममध्ये काम करणारा कामगार होता, ज्याला पक्ष्यांच्या संपर्कामुळे हा संसर्ग झाला होता.
हा विषाणू माणसांसाठी धोकादायक आहे का? तर हो, आहे. माणसांमध्ये या विषाणूच्या संक्रमणामुळे होणारा जास्तीतजास्त मृत्यूदर हा 60 टक्क्यांइतका आहे. आणि म्हणूनच हे चिंतेचे कारण आहे. या विषाणूच्या सध्याच्या स्वरुपामध्ये तरी माणसांकडून माणसांकडे याचे संक्रमण होण्याबाबत कसलीही उदाहरणे आढळली नसल्याने त्याबाबत माहिती नाहीये. म्हणजे ज्यांनी पक्ष्यांशी संपर्क केला आहे अथवा जे अनावधानाने पक्ष्यांच्या संपर्कात आलेत, त्यांनाच हा संसर्ग झाल्याचे सध्यातरी आढळले आहे. 

हेही वाचा - काय आहे बर्ड फ्लूची लक्षणे? रोगापासून वाचण्यासाठी काय कराल?​
काय आहे या रोगाचे प्रमाण?
2006 ते 31 डिसेंबर 2018 या दरम्यान भारतामध्ये बर्ड फ्लूचे 225 हॉटस्पॉट सापडले आहेत. यामध्ये 83.49 लाख पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. एकूण पॉल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे यामुळे 26.37 कोटींचे नुकसान झाल्याचे आकडेवारी सांगते. 
महत्त्वाची गोष्ट अशी की, या बर्ड फ्लूची पहिली केस ज्या महाराष्ट्र राज्यात सापडली त्या महाराष्ट्रात 2006 नंतर या विषाणूचा उद्रेक झालेला अद्यापतरी आढळला नाहीये. तसेच आता आढळलेल्या सर्व केसेस या महाराष्ट्राबाहेरच्याच आहेत. ओडीसा, त्रिपूरा आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्ये या विषाणूचे सातत्याने उद्रेक झालेले पहायला मिळाले आहेत. म्हणजे या विषाणूच्या संदर्भात ही राज्ये सततच हॉटस्पॉट राहिलेली आहेत.
सध्याचा उद्रेक दिसून येतोय त्यामध्ये बहुतांश जंगली पक्षी, कावळे आणि स्थलांतर करणारे पक्षी हे या विषाणूला बळी पडलेले आहेत.  २००6 पासून, कुक्कुटपालन उद्योगाने आपल्या शेतांमध्ये कटाक्षाने बायो सेफ्टी झोन ​​विकसित केले आहेत, त्यामुळे इथल्या पक्ष्यांचा कोणत्याही परदेशी पक्ष्याच्या संपर्कात येण्याला आळा बसला आहे.

चिकन-अंडी किती धोकादायक?
हा खरा आपल्यासमोरचा चिंतेचा विषय आहे. अभ्यास असं सांगतो की H5N1 हा विषाणू माणसामध्ये येण्याचे भारतातील चान्सेस कमी आहेत. दक्षिण आशियातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्वंयपाक बनवण्याच्या पद्धतीत असलेला लक्षणीय फरक हे याचे प्रमुख कारण आहे. याचं कारण असं आहे की हा विषाणू 70 डिग्री सेल्सियसच्या वरील तापमानात मरतो. दक्षिण आशियातील इतर देशांशी तुलना केली तर भारतामध्ये सर्रास सगळीकडेच जेवण बनवताना ते पुरेशा प्रमाणात शिजवले जाते. चिकन-मटण, अंडी यांना 100 डिग्री सेल्सियसच्या वरच शिजवल्यामुळे माणसांत हा विषाणू चिकन आणि अंड्यांच्या माध्यमातून येण्याचे चान्सेस फार म्हणजे फारच कमी आहेत.
भारतामध्ये दर महिन्याकाठी 30 कोटी पोल्ट्रीतले पक्षी आणि 900 कोटी इतकी अंडी खाद्यपदार्थांसाठी वापरली जातात. 

काय आहे सध्याची  परिस्थिती?
कोणत्या राज्यात किती पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे... यावर एक नजर टाकूयात...

गुजरातमध्ये 124 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 70 कावळे आणि 6 स्थलांतरण करणारे पक्षी मरण पावले आहेत.

ओडीसामध्ये 120 पोल्ट्री पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र ते सगळे बर्ड फ्लू निगेटीव्ह आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये 10 कावळे मेले आहेत. हे प्रदुषणामुळे मेल्याची शक्यता असली तरीही नमुने तपासणी साठी पाठवले आहेत.

राजस्थानमध्ये एकूण 2,166 पक्षी मेल आहेत. यामध्ये 1,706 कावळे तर 136 मोरांचा समावेश आहे.

छत्तीसगढमध्ये मेलेल्या चार कावळ्यांचे सॅम्पल्स चाचणीसाठी पाठवले आहेत.

कोरोनाच्या सुरवातीच्या काळात देखील लोकांनी भीतीपोटी चिकन-अंडी खाणे सोडून दिले होते, याचा फटका अर्थातच पोल्ट्री इंडस्ट्रीला बसला होता. या दरम्यानच्या निव्वळ दोन महिन्याच्या काळात 100 कोटी डॉलरचे नुकसान झाले होते. मात्र, या इंडस्ट्रीने लवकरच पुनरागमन केले खरे... मात्र, आता पुन्हा बर्ड फ्लूने डोके वर काढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Post a comment

0 Comments