करोना लस मोफत नाही, 'त्या' घोषणेनंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा यू-टर्न.

 नवी दिल्ली, दि. ०२ जानेवारी : देशभरात लसीकरणाची तयारी सुरू असून, शनिवारी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ड्राय रनचा आढावा घेतला. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी फक्त दिल्लीतच नाही, तर देशभरात करोनाची लस मोफत दिली जाणार असल्याचं सांगत सुखद धक्का दिला. केंद्राकडून झालेल्या घोषणंच स्वागत होत असतानाच केंद्रीय मंत्र्यांनी पुढच्याच क्षणी घुमजाव केलं. पहिल्या टप्प्यातच करोना लस मोफत दिली जाणार असल्याचं सांगत आरोग्यमंत्र्यांनी त्या घोषणेबद्दल खुलासा केला.
सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. इतरही लसी परवानगीच्या प्रतिक्षेत असून, केंद्र सरकारने लसीकरणासाठीची पूर्वतयारीही सुरू केली आहे. देशभरात ड्राय रन केलं जात आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी करोना लसीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली होती. मात्र, काही वेळातच त्यांनी सगळ्यांना मोफत लस दिली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.

प्रत्येक राज्यात ठराविक शहरांमध्ये ड्राय रन केलं जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयाचा दौरा करून ड्राय रनचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. करोना लसीसाठी नागरिकांना पैसे द्यावे लागतील की, दिल्लीप्रमाणे मोफत दिली जाणार आहे? असा प्रश्न हर्ष वर्धन यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले,”फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोना लस मोफत दिली जाणार आहे,” अशी माहिती दिली.देशभरात लस मोफत लस दिली जाणार असल्याचं वृत्त सगळीकडे पसरल्यानंतर आरोग्य मोफत लसीच्या घोषणेवर खुलासा करत सारवासारव करण्याची वेळ आली आहे. कोरोना लसीची किंमत 500 ते 600 रुपये असून पहील्या टप्प्यात ३० कोटीं लसींचे नियोजन आहे. त्यामुळे शासकीय तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. आरोग्यमंत्र्यांनी आज मोफत लसीची घोषणा केल्यानंतर सरकारअंतर्गत चक्र फिरली. पीएमओ कार्यालयाकडून जाब विचारल्यानंतरच आरोग्यमंत्र्यांनी घुमजाव केल्याचं सांगितलं जात आहे.

Post a comment

0 Comments