मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये चहा पिण्यास बंदी

मुंबईः राज्य सरकारने नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना ड्रेस कोडपासून ऑफिसच्या वेळेपर्यंत शिस्त लावण्याचा निर्णय घेतलाय. आता मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये कोणत्याही वेळेत चहा पिताना चकाट्या पिटणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही बंधने लादण्यात आली आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मंत्रालयाच्या इमारतीमधील कॉरिडॉरमधील चहा विक्री बंद करण्याचा निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतलाय.
मंत्रालयाची मुख्य इमारत, विस्तारित इमारतींमध्ये काम करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना कँटीनमार्फत चहा पुरवला जातो. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांसाठी कॉरिडॉरमध्ये चहाची विक्री होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात व्हिजिटर्स वेगवेगळ्या सरकारी कामांसाठी येतात. अनेकदा चहा पिण्यासाठी कॉरिडॉरमध्ये गर्दी होते. कोणत्याही वेळेत चहा पिण्यासाठी झुंबड उडालेली असते. त्यामुळे कार्यालयातील शिस्त बिघडल्याचे चित्र निर्माण होते. त्यामुळे कॉरिडॉरमध्ये चहाची विक्री न करता सहाव्या, तिसऱ्या मजल्यावरून कँटीनमधील कर्मचारी ट्रेमधून चहा पुरवतील. सकाळी साडेनऊ ते साडेदहा आणि दुपारी तीन ते चार या वेळेतच चहा पुरवण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं काढलेल्या परिपत्रकानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना भडक रंगाचे, रंगीबेरंगी कपडे घालता येणार नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांना आता जीन्स, टी शर्टही घालता येणार नाही. महिला कर्मचाऱ्यांनाही ड्रेसकोड ठरवून देण्यात आलाय. महिलांना कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा अशाच प्रकारचे कपडे घालणं बंधनकारक करण्यात आलंय. त्याचबरोबर प्रत्येक शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालावेत, असंही नव्या नियमांत सांगण्यात आलंय.

Post a comment

0 Comments