Advertisement

Responsive Advertisement

संपूर्ण लसीकरण करणाऱ्या पहिल्या 25 गावांनाविकासकामांसाठी अतिरिक्त निधी देणार - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
  औरंगाबाद :  कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येऊ नये यासाठी पात्र नागरिकांनी जवळच्या लसीकरण केंद्रात स्वत:चे लसीकरण करुन घ्यावे. लस पुर्णपणे सुरक्षित आहे. कोरोना झाला तरी लस घेतलेली असेल तर त्रास कमी होतो आणि कमी कालावधीत आपण बरे होतो. लसीकरण वाढावे यासाठी जिल्ह्यातील ज्या गावाने शंभर टक्के लसीकरण केले आहे अशा पहिल्या 25 गावांना मी विकासकामांमध्ये अतिरिक्त निधी देणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण् यांनी सांगितले. 
       जिल्हाभरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने ती वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी चव्हाण सरसावले असून लसीकरण मोहिमेला गती देऊन जास्तीत जास्त लसीकरण कसे होईल या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी गावागावात जाऊन लोकांना प्रशासनाकडून प्रोत्साहित केले जात आहे. 
  आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गल्लेबोरगाव, वेरुळ, तलाववाडी, सुलिभंजन, कागजीपुरा येथे गा्रमसभा पार पडल्या. या ग्रामसभेत त्यांनी लसीकरण करण्याचे आवाहन केले. 
   त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी रात्री 8 वाजता कागजीपुरा येथील फैज ए आम ट्रस्टच्या धर्मार्थ दवाखान्यास भेट  दिली. त्यानंतर रात्री 9 वाजता वेरुळ येथील दर्गा मस्जिद येथे अनेक मुस्लीम बांधवांना लसीकरण करुन घेण्याचे आवाहन केले त्यानंतर सुलिभंजन, वेरुळ, कसाबखेडा गावांना भेट देत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी गल्ले बोरगाव येथे मुक्काम केला.  त्यांची राहण्याची व्यवस्था सरपंच विशाल खोसरे यांचे बंधू दत्ता खोसरे या शेतकऱ्यांचे शेतातील घरात करण्यात आली होती.  जिल्हाधिकारी चव्हाण यांनी रात्री ग्रामस्थांसोबत येथेच भोजन घेतले, या वेळी लसीकरणसह ग्रामस्थांचे अडीअडचणी व विविध विषयावर चर्चा झाली. तसेच गल्ले बोरगाव येथील शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी या वेळी ग्रामस्थांना केले.
  आज सकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी यांनी शिवार फेरी मारली, दरम्यान गल्ले बोरगाव येथून 6  किलोमीटर पायी चालत जात शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. या वेळी त्यांच्या सोबत सरपंच विशाल खोसरे, उपसरपंच रामदास चंद्रटिके, पोलीस पाटील सिंधू बढे, तुकाराम हरदे, संजय भागवत, संतोष राजपूत, दिलीप बेडवाल यांच्यासह मॉर्निंग वॉक करणारे ग्रामस्थ उपस्थित होते.
  दरम्यान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गावात फेरफटका मारत असताना टाकळी येथील प्रगतीशील शेतकरी अशोक आहेर , बाळू दादा आहेर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व आहेर कुटुंबाशी संवाद साधला.
  या वेळी बऱ्याच ग्रामस्थांनी कुतूहलात्मक प्रतिक्रिया दिली की ‘चव्हाण साहेब हे पहिले  जिल्हाधिकारी आम्ही पाहिले की, जे खेडे गावात जाऊन मुक्कामी राहिले व जनतेशी थेट संवाद साधत आहेत व त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करीत आहेत’
 सकाळी 9.30 वाजता गल्ले बोरगाव येथे  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी गल्ले बोरगाव येथील लसीकरण बूथला भेट दिली व लसीकरणाचा आढावा घेतला. तदनंतर गल्ले बोरगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण निमित गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामसभा पार पडली. या वेळी मतदार यादीचे वाचन करण्यात आले. तसेच असंघटित कामगार नोंदणी व उर्वरित नागरिकांनी आपले तत्काळ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. तसेच गल्ले बोरगाव परिसरात आलेल्या ७०० ऊस तोड कामगारांचेही लसीकरण करून घेण्याच्या ही सूचना त्यांनी संबधीत आरोग्य विभागाला दिल्या.
  यावेळी उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे, सरपंच विशाल खोसरे, उपसरपंच रामदास चंद्रटिके, चेअरमन तुकाराम हारदे, पोलीस पाटील सिंधू बढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बलराज पांडवे, यांच्या सह मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या