Advertisement

Responsive Advertisement

पुरुषांनी आता घरातील जबाबदाऱ्या सांभाळायला हव्यात - आ. मनिषा कायंदेंऔरंगाबाद : पुरुषांनी आता घरातील जबाबदाऱ्या सांभाळायला हव्या, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे महिलांमध्ये गुण आहे. त्यामुळे आता ग्रामपातळीवर गावाला सांभाळण्यासाठी महिलांची गरज आहे. महिला सरपंच असताना महिलांचे पतीच कारभार पाहत असल्याची बाब महिला बालकल्याण समितीच्या दौऱ्यानिमित्त समोर आली. घरातील नियोजनाप्रमाणे गावातील निधीचा उपयोग करून योग्य ते नियोजन महिलाच करू शकतात. औरंगाबादेत आयोजित महिला सरपंच परिषदेत आमदार डॉ. मनिषा कायंदे बोलत होत्या.
यावेळी बोलतांना पुढे त्या म्हणाल्या, कोरोनात अनेक महिला सरपंचांनी अत्यंत महत्वाचे कार्य केले आहे. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांकडे मोठी समस्या आहे. राज्य घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून सर्व घटकातील लोकांना सोबत घेऊन विकास महिला सरपंचांनी करावा. महाराष्ट्रातील हा पहिला महिला सरपंच मेळावा आहे, येत्या काळात राज्यभरात हा उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे यावेळी आ. कायंदे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा तसेच महिला सरपंच परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना आदर्श गाव पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे म्हणाले की, सरपंचांनी ठरवलं तर २८८ जागा सुद्धा काबीज करू शकतात. ग्रामपंचायत सुधारली तर शेतकरी आणि महिला नक्कीच सुधारतील, माझ्या गावात मी दिलेल्या सुविधा या महिलांना डोळ्यासमोर ठेवूनच दिलेल्या आहे. देशात फक्त सीमेवरील जवान आणि गावातील बाईच इमानदारीने काम करत आहे.गावातील ३८ निराधार महिलांना ग्रामपंचायत जेवण पुरवत आहे. याच धर्तीवर शिवभोजन या निराधार नागरिकांना देण्यात यावे. माणूस जितका भ्रष्टाचार करतो त्या प्रमाणात महिला करत नाही, महिलांना बचत करण्याची सवय असते. सध्या ग्रामपंचायत कडे निधी नसल्याने अनेक अडचणी होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतचे कायदे आता बदलण्याची गरज आहे. आमची ग्रामपंचायत प्लास्टिक विकत घेते त्यामुळे कोणतीही महिला कचरा बाहेर फेकत नाही. हा सरपंच मेळावा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घ्यावा अशी अपेक्षा असल्याचे पेरे यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे व मीनाक्षी राऊत यांनीं केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या