Advertisement

Responsive Advertisement

डिसेंबर अखेरपर्यंत विकासकामे पूर्ण करा; पालकमंत्र्यांचे मनपाला निर्देशऔरंगाबाद :शहर विकासाच्या विविध विकासकामांचा आढावा घेऊन प्रगतिपथावर असलेली कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करा. त्याचबरोबर प्रस्तावित कामांचा पाठपुरावा करून ती लवकर पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी दिले. या कामांमध्ये अनेक महिन्यांपासून रखडलेल्या कामांचा समावेश असल्याने मनपा निवडणूकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे. डिसेंबरनंतर निवडणूका लागण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने व शहर अभियंता एस.डी. पानझडे यांनी कामांची माहिती दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानात ५,५५८ देशी झाडे लावण्यात येणार आहेत. आतापर्यंत ३,३०० झाडे लावली असून उर्वरित झाडे लावण्याचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल. पुतळ्याचे काम प्रगतिपथावर आहे. वॉल कंपाउंडचे काम नोव्हेंबरअखेर सुरू होईल, अशी माहिती पानझडे यांनी दिली. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे तसेच संत एकनाथ रंग मंदिराचे काम प्रगतिपथावर असून तेही डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.गरवारे स्टेडियमच्या विकासासंदर्भातील आराखडा तयार असून निधीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. गुंठेवारीत आतापर्यंत १,२५८ प्रस्ताव आले असून ६१० प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यातून मनपाला १२ कोटी २५ लाख रुपये मिळाल्याची माहिती उपअभियंता कोंबडे यांनी दिली. अधिकाधिक प्रस्ताव येण्यासाठी वॉर्ड निहाय शिबिरे घेऊन गुंठेवारी प्रस्ताव दाखल करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे. सातारा-देवळाइत ३८२ कोटी रुपयांचे जलनि:सारणाचे काम हाती घेण्यात आले आहे. एक टक्क्या प्रमाणे एमजेपीला २३ कोटी भरल्याशिवाय कामाला परवानगी मिळणार नसल्याचे या वेळी आले.आमदार संजय शिरसाठ म्हणाले, यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांशी बोलणे झाले आहे. शहरातील मुख्य रस्त्यासाठी ३१७ कोटींचा डीपीआर तयार करण्यात आला होता. मात्र, आता प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातील रस्त्याच्या कामाची यादी आल्यानंतर निधीत वाढ होणार असल्याने त्याचाही डीपीआर आठवड्यात तयार करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा योजना संदर्भात पालकमंत्र्यांनी जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजय सिंग यांना कामाची गती वाढवा. योजना वेळेत पूर्ण करा, शहराला सध्या उपलब्ध असलेल्या पाणी पुरवठ्यात आणखी वाढ करा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या