Advertisement

Responsive Advertisement

लेबर कॉलनीतील मूळ रहिवाशांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे


औरंगाबाद : विश्वासनगर-लेबर काॅलनीतील शासकीय वसाहतीच्या ३३८ घरांवर न्यायालयाच्या आदेशानंतर बुलडोजर फिरणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या कारवाईसाठी पथकांची नेमणूक देखील केली आहे. परंतु या कारावाईच्या विरोधात गेल्या अनेक वर्षापासून या घरांमध्ये राहणाऱ्या नागरीक आणि कुटुंबांनी आक्षेप घेतला आहे. उद्या सोमवारी या जीर्ण झालेल्या घर व इमारती पाडण्याची कारवाई केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी या भागातील नागरिकांची भेट घेतली. ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय नोकरीत होती आणि त्यांच्या निधनानंतर जे अनेक वर्षापासून तिथे राहत आहेत, त्यांनाच पर्यायी व्यवस्था आणि हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खैरे यांनी स्पष्ट केले.
पण अनेक घुसखोर देखील या वसाहतीमध्ये घुसले आहेत, त्यांना मात्र बाहेर काढणार, असेही त्यांनी सांगितले. विश्वासनगर-लेबर काॅलनीतील मोडकळीस आलेल्या व जीर्ण झालेल्या घरांचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेला आहे. न्यायालयाने वारंवार नोटीस बजावल्यानंतर देखील येथील नागरिकांनी घरे रिकामी केली नाही.
३०-३५ वर्षापासून अनेक कुटुंब येथे राहतात. त्यामुळे आधी आमची पर्यायी व्यवस्था करा, मगच कारवाईची भाषा करा, अशी मागणी येथील रहिवांशी केली आहे. अनेक राजकीय पक्षांनी देखील हीच भूमिका घेतली. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत देखील यावर चर्चा झाली, तेव्हा कायद्याने काम करू, नागरिकांना दिलासा देण्याचाही प्रयत्न करू, असा विश्वास त्यांनी येथील रहिवाशांना दिला होता.
परंतु न्यायालयाच्या आदेशानूसार उद्या विश्वासनगर-लेबर काॅलनीत कारवाई होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी या वसाहतीतील अनेक घरांवर घुसखोरांनी कब्जा केल्याचा आरोप केला. काहींनी तर ही घरे दुसऱ्याला भाड्याने दिली आहे. अशा घुसखोरांमुळेच खऱ्या हक्कदारांचे नूकसान होत आहे, त्यामुळे आपण अशा घुसखोरांना पाठीशी घालणार नाही.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याशी देखील चर्चा केली आहे. त्यामुळे घुसखोरांना तर बाहेर काढणारच, पण ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय नोकरीत होती, आता ती हयात नाही, अशा मुळ कुटुंबाची पर्यांयी व्यवस्था, त्यांना घर मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. पालकमंत्री सुभाष देसाई यांची देखील हीच भूमिका आहे, मी त्यांच्यांशी व विभागीय आयुक्तांशी उद्या बोलणार आहे, असेही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या