Advertisement

Responsive Advertisement

आमदारांनी गावातील कामात ढवळाढवळ करू नये, उपसभापती नीलम गोऱ्हेंचा महिला सरपंच परिषदेत टोला


औरंगाबाद : आमदारांनी गावातील कामात कामात ढवळाढवळ करू नये, स्थानिक जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना काम करू द्यावे. महिला अथवा पुरुष सरपंच कोणीही असले तरी ते गाव महिलेसाठी सुरक्षित असायला हवे. महिला पुढे जाताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मनामध्ये कोणतीही खेदाची भावना ठेवू नका. भरलेला खिसा जग दाखवतो परंतु रिकामा खिसा जगातील माणसे दाखवतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तुम्हाला चांगल्या संधी आहेत त्यासाठी प्रयत्न करा. मात्र संधी मिळाली नाही तर खचून न जाता आपला प्रवास सुरूच ठेवा, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले.औरंगाबादेत जिल्हा परिषद पदाधिकाऱ्याकडून महिला सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे उदघाटन सोमवार (दि.८) रोजी तापडिया नाट्य मंदिर येथे महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे व मान्यवरांच्या हस्ते आले. यावेळी ग्रामविकास राज्य मंत्री अब्दुल सत्तार, विधान परिषद सदस्य मनीषा कायंदे, अंबादास दानवे, जिल्हा परिषद अध्यक्ष मीनाताई शेळके आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, १९९१ साली मी पहिली महिला परिषद पुण्यात घेतली होती, त्यावेळी बैठकीला बोलावले जात नाही ही खंत महिलांनी व्यक्त केली होती. आज घडीला मोठ्या प्रमाणावर महिला साक्षर आहेत. स्व. राजीव गांधी यांनी पहिल्यांदा महिला बाबत मसुदा काढला होता तर स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी १९९१ ला पहिल्यांदा महिलांना रणरागिणी म्हणून संबोधले. बोलताना गोऱ्हे म्हणाल्या की, महिला सरपंचांना अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर बोलायचं असतं परंतु त्याला अडचणी निर्माण होतात.निधी मिळवण्यासाठी पुरुष सरपंच अग्रेसर असतात, त्यामध्ये महिला सरपंचांना अडचणी निर्माण होतात. गावात आरक्षण मिळाले परंतु महिलांचा अजेंडा किती पुढे नेण्यात आपण यशस्वी झालो आहे, याचा विचार या परिषदेत करण्याची गरज आहे. महिला सरपंच ज्याठिकाणी मागणी करेल त्याठिकाणी अधिकाऱ्यांनी मदत केली पाहिजे. आरोग्य, शिक्षण, पाणी आदी योजना महीला सरपंच चांगल्या पद्धतीने राबवतात. आता महिला सरपंचांनी अभ्यास करून निर्णय घ्यायला हवा, महिला सरपंचाच्या अविश्वास ठरावावर सुद्धा त्या महिलेची सही असल्याच्या घटना घडल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या