Advertisement

Responsive Advertisement

प्रामाणिकपणे काम केले असते तर आकाशदिव्यांवर प्रचाराची गरज भासली नसती, मनसेचा शिवसेनेला टोला


औरंगाबाद : शिवसेनेने शहर भकास केले आहे. शहरात दाखविण्यासारखे एकही विकास काम त्यांच्याकडे नाही. प्रामाणिकपणे काम केले असते तर आकाशदिव्यांवर प्रचाराची गरज भासली नसती. जनता त्यांना निवडणुकीत जागा दाखवेल. असा टोला मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी शिवसेनेला लगावला आहे. शिवसेनेने शहरात विविध ठिकाणी दोनशे आकाशदिवे लावले असून, त्या माध्यमातून मनपा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.विशेषतः यात स्मार्ट सिटी योजनेतील कामांचे श्रेयही शिवसेनाच लाटत आहे, हे विशेष. शिवसेनेने प्रामाणिकपणे विकास कामे केली असती तर दिव्यांच्या शुभेच्छांची गरज भासली नसती, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. शिवसेनेने दिवाळीनिमित्त शहरभर २०० आकाशदिवे लावले आहेत. ७ बाय ७ फूट आकाराचे दिवे स्टीलच्या फेमवर साकारले असून विजेचे खांब, इमारती तसेच चौकात ते लावले आहेत. प्रत्येक वॉर्डात किमान एक तर महत्त्वाच्या ठिकाणी २-३ दिवे लावल्याची माहिती जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी दिली.निवडणुकीच्या तोंडावर आकाशदिव्यांचा प्रचारासाठी वापर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.शहरात करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती या ‘विकासदीपा’तून देण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना या कामाची माहिती नसते. आकाशदिव्यातून ती त्यांच्यापर्यंत पोहचेल. याचा निवडणुकीशी संबंध नाही. १६८० कोटीची पाणीपुरवठा योजना, रस्त्यांसाठी १५२ कोटींचा निधी, गुंठेवारीची घरे नियमित करणे, चिकलठाणा व पडेगाव येथे कचरा प्रक्रिया केंद्र, कांचनवाडीत बायोमिथेन प्रकल्प, ठाकरे स्मृतिवन व स्मारकाचे भूमिपूजन, सफारी पार्कसाठी १७४ कोटी मंजूर, स्मार्टसिटी बसडेपोचे भूमिपूजन, कमांड अँड कंट्रोल रुमचे लोकार्पण याबाबत मजकूर लावण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या