Advertisement

Responsive Advertisement

कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय; लेबर कॉलनी प्रकरणी पालकमंत्र्यांचे हात वरऔरंगाबाद : लेबर कॉलनीतील घरे पाडण्याच्या कारवाई प्रकरणी योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. मात्र कायद्याच्या पुढे जाता येणार नाही, कायद्याच्या चौकटीत राहून काय करता येईल याबाबत विचार करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे लेबर कॉलनीवासियांना पालकमंत्र्यांकडून असलेल्या आशा मावळल्या आहेत. सोमवारची कारवाई टळली असली तरीही कारवाई होणारच याबाबत पालकमंत्र्यांनी संकेत दिले आहेत.लेबर कॉलनीतील रहिवाशांनी सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. आम्हाला विश्वासात न घेता घरे पाडण्याचा निर्णय घेण्यात आला, हे चुकीचे आहे. ५० वर्षांपासून आम्ही येथे वास्तव्यास आहोत, आता अचानक आम्हाला नोटिसा देत घरे पाडण्याची कारवाई केली जात आहे. यामुळे आम्ही बेघर होऊ, आम्ही मुलांना घेऊन कोठे जायचे ? ही कारवाई थांबवा, असा सवाल करीत रहिवाशांनी ही कारवाई थांबविण्याची मागणी केली.काही जणांनी आमचे पुनर्वसन करा आणि मगच कारवाई करा, अशी भूमिका घेतली. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी उपस्थित सर्व रहिवाशांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांनी केलेल्या सूचनांचीही नोंद घेतली. दरम्यान, पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर लेबर कॉलनीप्रकरणी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. हा निर्णय घेताना कायद्याच्या चौकटीत राहून, न्यायालयाचा निर्णय काय आहे, सध्याची परिस्थिती लक्षात घेता काय करता येईल, याबाबत विचार केला जाणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या