Advertisement

Responsive Advertisement

पाणीपुरवठा कर्मचाऱ्यानेच ठोकले ग्रामपंचायत कार्यालयाला कुलुपऔरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या लोणी खुर्द ग्रामपंचायत कार्यालयाला दस्तुरखुद्द पाणी पुरवठा कर्मचाऱ्याने ऐन दिवाळीच्या दिवशीच पगाराचे कारण देत कुलूप ठोकल्याची घटना उघडकीस आली आहे. पाणीपुरवठ्याची योग्य वसूली झालेली नसल्याने पाणी पुरवठा कर्मचाऱ्याच्या पगारात ५० टक्के कपात करण्यात आली. मात्र यामुळे व्यथित झालेल्या कर्मचाऱ्याने मोठे पाऊल उचलले.याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या २१ महिन्यांपासून वसुली झालेली नाही. लोणी खुर्द येथील ग्रामपंचायत ‘ड’ वर्गात समाविष्ट झाल्याने येथील वसूली कर्मचाऱ्यांच्या पगारात पन्नास टक्के कपात करण्यात आली. याविषयी कर्मचारी प्रभाकर जाधव यांनी सांगितले, २१ महिन्यांपूर्वी मला ५१०० रुपये इतका पगार होता आता तो मला २५०० रुपये देण्यात येतो. त्यात माझ्या प्रपंचाचा खर्च भागत नाही. त्यामुळे माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याच प्रमाणे पाणी फिल्टरची साफसफाई करुन घेण्यासाठी माझ्या स्वखर्चाने तीन हजार रुपये खर्च केले असता तोही खर्च ग्रामपंचायत प्रशासनाने दिले नसल्याने माझ्यावर ऐन सणाच्या दिवशीच उपासमारीची वेळ आली.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला जलशुद्धीकरण या प्लांट वर वार्षिक अडीच हजार रुपये मानधन देऊ केले, परंतु लोणी खुर्द येथील ग्रामविकास अधिकारी साहेबराव जाधव यांनी ते हेतूपुरस्कर दिले नाही. गेल्या आठ दिवसापासून दस्तरखुद्द ग्रामविकास अधिकारी साहेबराव जाधव हे ग्रामपंचायत कार्यालयाला हजर नसल्यामुळे तेही पैसे मला मिळाले नसल्याने माझी आर्थिक परिस्थिती अडचणीची निर्माण झाल्याने मी शेवटचा उपाय म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले आहे. जोपर्यंत गटविकास अधिकारी साहेब येत नाही. तोपर्यंत मी ग्रामपंचायतीचे कुलूप उघडणार नाही. असा पवित्रा पाणीपुरवठा कर्मचारी प्रभाकर जाधव यांनी घेतला आहे.याप्रसंगी त्यांच्यासोबत गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. पाणीपुरवठा कर्मचारी प्रभाकर जाधव हा अत्यंत चांगल्या पद्धतीने पाणीपुरवठ्याचे काम करतो. त्याला गेल्या २१ महिन्यांपासून अर्धा पगार मिळतो. त्यात त्याचा उदरनिर्वाह होत नाही. आणि सणासुदीला देखील त्याला त्याच्या खिशातील खर्च झालेले पैसे ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेले नाही. जलशुद्धीकरणावरील अडीच हजार रुपये मानधन व तीन हजार रुपये झालेला खर्च जरी दिला असता तरी त्यांची दिवाळी गोड झाली असती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या