Advertisement

Responsive Advertisement

मुळा उजवा कॅनल प्रमाणे मुळा डावा कॅनलला पाणी सोडा - सुरेशराव लांबे पाटील


अहमदनगर : राज्यासह राहुरी तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक अस्मानी व सुलतानी संकटाने मोठ्या प्रमाणावर अडचणीत असताना महावितरण कंपनीने पठाणी वसुली सुरू करून या पठाणी वसुली ला पाठिंबा मिळण्यासाठी शासन स्तरावरून पाटपाणी हेतुपुरस्सर बंद करण्यात आले असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी केला आहे.

यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कापूस, कांदा, तूर, सोयाबीन पिके वाया गेली. तसेच उसाला तोड नसल्याने उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. उसाला तुरे फुटल्याने वजन घटले आहे. यातूनच शेतकरी मोठ्या अडचणीतून मार्ग काढत कांदा, गहू, हरभरा इत्यादी पिकांच्या लागवडी करत आहे. परंतु ज्या शासनातील नेत्यांनी निवडणुकीच्या आधी जाहीर सभेतून शासनाची कोणती बाकी भरणार नाही, विज बिल भरायचं काही कारण नाही, शेतकऱ्यांना वीज फुकट मिळाली पाहिजे व ती दिवसा मिळाली पाहिजे. तेलंगणा सारखे राज्य जर २४ तास वीज फुकट देते तर महाराष्ट्र का देऊ शकत नाही. आम्ही सत्तेवर आल्यास सरसकट कर्जमाफी देतानाच याही गोष्टी करू व शेतकऱ्यांच्या जीवनात नवी आशा निर्माण करू अशा वल्गना करणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना त्यांच्याच भाषणाचा विसर पडलेला दिसत आहे. शेतकऱ्यांना विज बिल माफी न देता खोट्या वाढीव बिलाच्या सवलती देऊन गाजर दाखवली जात आहे.

परंतु शेतकरी अडचणीत असल्याने पैसे भरू शकत नसताना या पठाणी वसुलीला पाठिंबा देण्यासाठी व शेतकऱ्यांची अडवणूक करण्यासाठी धरण गच्च भरलेले असताना दोन्ही कॅनॉलचे पाणी सोडले जात नाही. याचा अर्थ न समजण्याइतके शेतकरी दूध खुळे राहिलेले नाहीत. याचा आता सत्ताधाऱ्यांनी गंभीरपणे विचार करून ट्रांसफार्मर  बंद करण्याची व शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचे धोरण त्वरित बंद करून दिशाभूल थांबवावी व आपण जाहीर केलेली विज बिल माफी व दिवसा वीज या आश्वासनाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा शासनकर्त्यांना मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या