Advertisement

Responsive Advertisement

४०० वर्ष जुन्या मेहमूद दरवाज्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू


औरंगाबाद : शहरातील ४०० वर्ष जुन्या मेहमूद दरवाज्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले आहे. यामध्ये दरवाज्याचे नुतनीकरण आणि संवर्धन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या दरवाज्याचे सौंदर्यीकरण देखील करण्यात येणार आहे. दरवाजाची अवस्था अत्यंत खराब झाल्याने स्मार्ट सिटी ने दोन ते तीन वेळा निविदा सादर केली होती. मात्र गेले कित्येक महिने या कामास मोठ्या प्रमाणावर विलंब झाल्यानंतर आता कुठे हे काम सुरू झाले आहे.शहरातील सर्वात जुन्या मेहमूद दरवाजाचे नूतनीकरण करण्याचे काम मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटीने हाती घेतले आहे. यामध्ये दरवाजाची डागडुजी करून त्याला नवीन रूप देण्याचे काम करण्यात येणार आहे. दरवाजाच्या जा भागाची डागडुजी करता येऊ शकत नाही, तो भाग पाडून तेथे नवीन बांधकाम करण्यात येईल. चारशे वर्षांपूर्वी दरवाजा बनवण्यासाठी जी पद्धत वापरण्यात आली होती त्याच पारंपारिक पद्धतीने हे काम करण्यात येणार आहे. यासाठी चुना, दगड, वीट यांचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी चुना भिजवण्यासाठी हौद देखील तयार करण्यात आले आहेत. यासाठी स्मार्ट सिटी ने एकूण ३८ लाखांचे टेंडर काढले होते.चार महिन्यांच्या कालावधीत हे काम पूर्णत्वास येईल. औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा बक्षी यांनी सांगितले की, या दरवाजाच्या नूतनीकरणाचे काम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. औरंगाबादचे मुख्य आकर्षण बीबी का मकबरा आणि पानचक्कीकडे जाण्याचा हा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे या दरवाजाचे नूतनीकरण करून त्याला त्याचे गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. यासाठी आम्हाला नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. हा दरवाजा अत्यंत खराब परिस्थिती मध्ये असल्यामुळे दगड कोसळण्याची भीती आहे म्हणून स्मार्ट सिटी तर्फे आवाहन करण्यात आले की काम होईपर्यंत नागरिकांनी पर्यायी रस्ता वापरावे. यासाठी स्मार्ट सिटी बॅरिकेड ही लावलेले आहेत. यानंतर दरवाजाचे सौंदर्यीकरण आणि आकर्षक रोषणाई देखील करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या