Advertisement

Responsive Advertisement

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई अटळ; जालना रोडवरील प्रसिद्ध राज वस्त्रदालन सील


औरंगाबाद : जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्या पथकाने जालना रोडवरील काही बड्या आस्थापनांमध्ये गर्दीचे नियम पाळले जात आहेत की, नाही, हे आज दुपारी अचानक तपासले. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने आकाशवाणी समोरील राज क्लॉथ या दुकानाला पथकाने सील केले. तसेच शहरात जमावबंदीच्या आदेशाचेही सरार्स उल्लंघन होताना दिसत आहे.
जिल्हा प्रशासनाने नियुक्त केलेल्या सहायक कामगार उपायुक्त वाय.एस.पडियाल, मनपाचे वॉर्ड अधिकारी संपत जरारे, जिन्सी पोलीस व इतर कर्मचाऱ्यांनी राज शोरूमला सील करण्याची कारवाई केली. गर्दीवर नियंत्रण यावे, कोरोना प्रतिबंधक लसीकरण शंभर टक्के व्हावे, यासाठी कारवाई करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नसल्याचेही पडियाल यांनी सांगितले.शहर व जिल्ह्यातील सर्व आस्थापना, व्यावसायिक बाजारपेठांनी नियम पाळणे गरजेचे आहे. आलेल्या ग्राहकांचे लसीकरण झाले की नाही, याची खातरजमा प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे. जालना रोडवरील अनेक ठिकाणी अचानक तपासणी केल्यानंतर जेथे नियमांचे उल्लंघन झाले, ती दुकाने सील केली आहेत, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, जालना रोडवर वस्त्रदालन सील करण्याची कारवाई होताच, व्यापाऱ्यांनी तातडीने जिल्हाधिकारी चव्हाण यांची भेट घेऊन, सगळ्या कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस झाल्याचे सांगितले. ग्राहकांची तपासणी करण्यात येत असल्याचाही दावा केला. परंतु गर्दीचे नियम मोडले जात आहेत, त्यामुळे कारवाई करणारच, यावर जिल्हाधिकारी ठाम राहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या