Advertisement

Responsive Advertisement

नाविन्यपूर्ण उपक्रमाने डॉ. बाबासाहेबआंबेडकर जयंती साजरी करा- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,  :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा असे सांगितले. या महामानवाची जयंती समाजोपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रमांनी साजरी व्हावी, या जिल्ह्याची ती ओळख असावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केली.
एमजीएमच्या आर्यभट्ट सभागृहात मध्यवर्ती शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक निमित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.पवन बनसोड आदींसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, पोलिस पाटील यांची उपस्थिती होती. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी भराडीमध्ये कोणीही मद्य सेवन करत नाही. व्यसनमुक्तीचा प्रचार, प्रसार तिथे करण्यात येतो. करमाडमध्ये स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्यात येते, अशा नवनवीन उपक्रमांनी महामानवांची जयंती साजरी करावी. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरात पोहचण्यासाठी व्याखानांचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना केले. 
डॉ. आंबेडकर जयंतीदिनी वीज भारनियमन होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. जयंती साजरी करताना शासनाच्या सर्व नियमांचे पालन सर्वांनी करावे. ध्वनीची तीव्रता अधिक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार डीजेस मनाई असल्याने पारंपरिक वाद्यांचा वापर मंडळ, उत्सव समित्यांनी करावा. मंडप, स्टेजचा वाहतुकीस अडथळा होऊ नये, त्यामुळे ते टाळावे. एक गाव एक मिरवणूक संकल्पना राबविल्यास समाजात एकोपा निर्माण होईल. दुचाकी ऐवजी सायकल रॅलीचे आयोजन करावे. ‍मिरवणुकीशिवाय समाजोपयोगी कामांवर पदाधिकारी यांनी अधिक भर द्यावा, असेही जिल्हाधिकारी चव्हाण यावेळी म्हणाले. 
 उत्सव समिती पदाधिकारी यांनी मिरवणुकीची परवानगी नजिकच्या पोलिस स्थानकातून घेणे आवश्यक आहे. प्रस्तावित मिरवणूक मार्गाशिवाय परस्पर बदल करू नये.मिरवणूक इतर मार्गाने घेऊन जाऊ नये. मिरवणुकीस जयंतीदिनी रात्री 12 पर्यंत परवानगी आहे. त्यामुळे विहित वेळेत मिरवणूक काढावी. आक्षेपार्ह नारे, घोषणा यावर वेळीच प्रतिबंध करावा. कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मिरवणूक, कार्यक्रमादरम्यान उत्सव समितीने स्वयंसेवक नेमावेत. दुचाकी रॅली टाळावी, जेणेकरून अपघात होणार नाहीत. समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह मजकूर, बातमी, माहिती याची सत्यता पडताळावी, खात्री करावी किंवा याबाबत तत्काळ स्थानिक पोलिस स्थानकास माहिती द्यावी. समाजात तेढ निर्माण होतील, असे संदेश समाजमाध्यमांवर पाठवू नयेत. मिरवणूक, कार्यक्रमानंतर संबंधित साहित्य, बॅनर, फ्लेक्स, पताका काढून घ्यावेत. फटाक्यांचा मर्यादित वापर करावा. शक्यतो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या ऐवजी प्रतिमेचा मिरवणुकीत वापर करावा, अशा सूचना डॉ. बनसोड यांनी दिल्या. उपस्थित उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही विविध सूचना प्रशासनाला केल्या. त्यांच्या सूचनांचीही दखल प्रशासनाने तत्काळ घेतली. बैठकीचे सूत्रसंचालन विशाल नेहूल यांनी केले.   
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या