Advertisement

Responsive Advertisement

दर्जेदार शिक्षणासाठी डीपीसीतून मिळणार पाच टक्के रक्कम- उपमुख्यमंत्री अजित पवार


- आमदार काळे यांच्या निधीतून दहा कोटींची मराठवाड्यातील शाळांना पुस्तके 

औरंगाबाद, :  राज्यातील शिक्षण दर्जेदार असावे, गुणवत्ता वाढावी यासाठी जिल्हा नियोजन समिती योजनेच्या (डीपीसी) अर्थसंकल्पातील किमान पाच टक्के निधी हा शिक्षणावर खर्च करण्यात येणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात शिक्षणावर शासन जवळपास सहाशे कोटी रूपयांची तरतूद करणार असल्याची ग्वाही अर्थ, नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी आज दिली. 
आमदार विक्रम काळे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून औरंगाबाद विभागातील 3300 शाळांच्या ग्रंथालयांसाठी पुस्तके वितरण व मुख्याध्यापक कार्यशाळेत श्री.पवार बोलत होते. एमजीएम विद्यापीठातील रुक्मिणी सभागृहातील या कार्यक्रमास पद्मविभूषण खासदार शरद पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आमदार अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, माजी आमदार अमरसिंह पंडित, डॉ. कल्याण काळे, कैलास पाटील, संजय दौंड, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले,  वाचनाने माणूस समृद्ध्‍ बनतो.  जीवनात यशस्वी होतो. आमदार काळे यांच्या आमदार निधीतून मराठवाड्यातील  तीन हजार 300 शाळांमध्ये 10 कोटी 31 लाख 25 हजारांची जवळपास 12 लाख पुस्तके शाळांच्या ग्रंथालयात पोहोचणार आहेत. नक्कीच ही बाब शिक्षण चळवळीला नवी दिशा देणारी आहे. आमदार काळे सातत्याने शिक्षकांचे प्रश्न मांडतात. शैक्षणिक चळवळ जागृत ठेवतात. त्यांनी जवळपास पाच हजार संगणक व प्रिंटर शाळांना उपलब्ध करून दिले आहेत. ज्याचा फायदा कोरोना  काळात  विद्यार्थ्यांसह  शिक्षकांनाही झाला. आमदार काळे यांच्या  निधीतून वितरित करण्यात येणाऱ्या पुस्तकातून अनेक जबाबदार नागरिक घडण्यास मदत होणार आहे. पुस्तके ज्ञान देतात, आत्मविश्वास वाढवतात, संकटाला सामोरे जाण्याची ताकद देतात. पुस्तक वाचनातून शालेय जीवनात बालवयापासूनच विद्यार्थ्यांवर संस्कार होत असतात, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.  
पुस्तक वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते. आमदार काळे यांनी निधीचा सुयोग्य वापर करून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुढाकार घेतल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक आहे. शिक्षणमंत्री असताना शिक्षण संघटना, नेते यांच्याशी जवळून संबंध आल्याने  शिक्षण क्षेत्राचा अनुभव असल्याचे खासदार पवार यांनी यावेळी सांगितले. 
अध्यक्षीय समारोप कमलकिशोर कदम यांनी केला. यामध्ये त्यांनी सध्याच्या परिस्थितीत सर्वांचेच वाचन कमी झालेले आहे. विद्यार्थी अधिक वाचत असले तरी प्राध्यापकांनीही वाचनात वाढ करणे आवश्यक असल्याचे मत मांडले. प्राध्यापक, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना  वर्गात शिकविताना संबंधित विषयाचे परिपूर्ण वाचन करूनच जावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांना दिला. पुस्तक वितरण कार्याचे कौतुक करताना सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्यात आमदार काळे यांनी हातभार लावल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. 
सुरूवातीला खासदार पवार, उपमुख्यमंत्री पवार यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात शाळेच्या मुख्याध्यापकांना पुस्तके वितरीत करण्यात आले. आमदार काळे यांनी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व ग्रंथ भेट देऊन मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकही त्यांनी केले. यावेळी आमदार स्थानिक विकास निधीतून पुस्तके वितरण या संकल्पनेबाबत सांगितले.  त्याचबरोबर विनाअनुदानित शाळा, जुनी पेंशन योजना लागू करणे आदी मागण्याही आमदार काळे यांनी यावेळी केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान इंगळे यांनी केले. 
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या