Advertisement

Responsive Advertisement

मांगीरबाबा यात्रा उत्सवासप्रशासनाचे संपूर्ण सहकार्य- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण


औरंगाबाद,  :  मांगीरबाबा यात्रेसाठी लाखो भाविक शेंद्रा येथे राज्यभरातून येतात. त्यांना चांगल्या दर्जाच्या मुलभूत सुविधा मिळाव्यात. यासाठी सर्व यंत्रणांनी चोखपणे जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यंत्रणेतील अधिकाऱ्यांना दिले. यात्रेसाठी आवश्यक ते संपूर्ण सहकार्य प्रशासनाकडून करण्यात येईल, असा विश्वासही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी मांगीरबाबा देवस्थान समिती, ग्रामस्थांना आज दिला.
जिल्हाधिकारी यांनी शेंद्रा येथे मांगीरबाबा मंदिरास भेट देऊन 19 तारखेच्या मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या मांगीरबाबा यात्रेत भाविकांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक नीलेश गटणे, जिल्हा पोलिस अधीक्षक निमित गोयल, उपविभागीय अधिकारी सोमनाथ रोडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर शेळके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजेय चौधरी, महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, लोहमार्ग पोलिस आदी विभागांसह सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मंदिर समितीचे अध्यक्ष भास्कर कचकुरे, सचिव सुरेश नाईकवाडे, योगेश कचकुरे, किशोर शेजूळ, वैजिनाथ मुळे, साळुबा कचकुरे, ‍जिल्हा परिषद शालेय समितीचे अध्यक्ष राम कचकुरे, सुभाष पाचुंदे, राजू भालेराव, जॉन आव्हाड आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
     राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्तीभावाने भाविक शेंद्रा येथे मांगीरबाबाच्या दर्शनासाठी येतात. भाविकांना मुलभूत सुविधा ‍मिळाव्यात, यासाठी प्रशासनाचे सर्वोतोपरी सहकार्य शेंद्रावासीयांना असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. 
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक यांनी सुरूवातीला मांगीरबाबांचे दर्शन घेतले. तद्नंतर यात्रा काळातील विधीवत पूजा, पारंपरिक कार्यक्रमांची माहिती जाणून घेतली.  भाविकांची निवासाची जागा, मुबलक पाण्याची व्यवस्था, रेल्वे जवळील रस्त्याची  दुरूस्ती, दोन रूग्णवाहिका, खड्डे बूजविणे, बस थांबा आदी कामांची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी यांनी केली. त्याचबरोबर अग्नीशमन केंद्र, जिल्हा परिषद शाळेलाही जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान मातंग समाज आणि शेंद्रावासीयांच्यावतीने जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. 
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या