Advertisement

Responsive Advertisement

राज ठाकरेंनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचं राजकारण सुरु केलंय; राऊतांचा थेट निशाणा

मुंबई - राज ठाकरेंनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचं राजकारण सुरु केलंय असा टोला संजय राऊत  यांनी लगावला आहे. आज जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे. त्याच निमित्तानं संजय राऊतांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना कधीही भोंग्यांची गरज लागली नाही, असेही खडे बोल संजय राऊतांनी राज ठाकरेंना सुनावले आहेत. 
शिवसेना  खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "बाळासाहेबांच्या फटकाऱ्यांनी कोणालाही सोडलं नाही. कुंचला आणि वाणी या दोन अमोघ शस्त्रांनी महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात सत्तापरिवर्तन केलं. ही कुंचल्याची ताकद आहे. म्हणून आजही आम्ही व्यंगचित्राच्या कुंचल्यापुढे नतमस्तक होतो. बाळासाहेबांप्रमाणे एखादा व्यंगचित्रकार या देशात पुन्हा निर्माण व्हावा. तसेच, देशात सध्या जे काही चाललेलं आहे. एकाधिकारशाही, मनमानी यावर आसूड ओढावे, अशी आम्ही प्रार्थना करतो. ज्यांच्यामध्ये ही क्षमता होती असं आम्हाला वाटायचं, त्यांनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचं राजकारण सुरु केलं आहे." "भोंग्यांच्या राजकारणामुळे कालपासून 24 तासांत लाखो हिंदूंनी नाराजी व्यक्त केलीये आमच्याकडे. शिर्डी, त्रंवकेश्वर यांसारख्या अनेक तिर्थस्थळांवर काकड आरती होऊ शकली नाही. त्यामुळे असंख्य भाविक नाराज झाले आहेत. तुम्ही मशिदीवरील भोंग्याचं राजकारण सुरु केलं आणि ते हिंदूंच्या गळ्यापर्यंत आलं आहे", असं राऊत म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे आधी व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांनी आधी व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे मारले. त्यांना कोणत्याही भाडोत्री भोंग्याची गरज लागली नाही. बाळासाहेबांची कला पुढे जाईल असं वाटलं होतं, पण भाजपनं त्या व्यंगचित्रकलेचा गळा घोटला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वेगळं चित्र निर्माण झालंय.", असं राऊत म्हणाले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या