Advertisement

Responsive Advertisement

.राजगर्जनेनंतर उद्धव ठाकरेंची तोफ औरंगाबादेत धडाडणार, जलील यांच्याकडूनही सभेची घोषणा; ठिकाण तेच नियमावली तीच असणार का?
औरंगाबादः महाराष्ट्र दिनी मनसेची राज गर्जना झाल्यानंतर आता औरंगाबादेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. येत्या 08 जून रोजी शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा औरंगबादमध्ये आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक ऐतिहासिक सभा शहरातील ज्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर झाल्या, त्याच ठिकाणी राज ठाकरेंनी विराट सभा घेतली. मनसेच्या सभेवेळी हे ग्राउंड खचाखच भरलं होतं. आता शिवसेनेनंही याच मैदानावर सभा घेण्याची घोषणा केली आहे तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही सभेची तयारी सुरु केली आहे. मनसे, शिवसेना येथे लाखोंची सभा घेऊ शकते तर एमआयएमदेखील मागे राहणार नाही. आम्हीही येथे सभा घेऊ. मनसेच्या सभेत तरी खुर्च्या टाकून ग्राउंड भरले होते, एमआयएम तर खुर्च्या न टाकता दुपटीने गर्दी जमवू शकते, असं आव्हान खासदार इम्तियाज जलील यांनी दिलं आहे. मात्र मनसेच्या सभेला औरंगाबाद पोलिसांनी ज्या अटी घातल्या, त्याच अटी शिवसेना आणि एमआयएमच्या सभेला पोलीस घालणार का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.


राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यापूर्वी औरंगाबाद पोलिसांनी बराच वेळ घेतला. अनेक बैठकांनंतर सभेला परवानगी देण्यात आली, मात्र त्यासाठी 16 अटी घालण्यात आल्या. त्यातली मुख्य अट म्हणजे मैदानावर फक्त 15 हजार लोकांनाच परवानगी असेल .त्याहून जास्त लोक आल्यास कारवाई करण्यात येईल, अशा इशारा पोलिसांनी दिला होता. आता उद्धव ठाकरे यांच्या सभेलाही मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सभेचं मैदान तेच असलं तरी औरंगाबाद पोलीस आता शिवसेनेच्या सभेलाही त्याच अटी घालणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबाद पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले आहेत, ते अत्यंत सौम्य स्वरुपाचे आहेत, असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. आता आम्हीदेखील सभेत आणखी चांगली भाषा वापरू, मग कारवाई होतेच कशी, हेही पाहून घेईल, असा इशारा जलील यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या