Advertisement

Responsive Advertisement

देशाची आर्थिक प्रगती करताना समाजाला वाटा मिळायला हवा- ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

            मुंबई, दि. 10 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील लोकशाही व्यवस्थेला प्राधान्य देत मोठमोठे उद्योग सार्वजनिक क्षेत्रात उभे केले. या देशाची आर्थिक प्रगती करताना याचा वाटा समाजाच्या प्रत्येक घटकाला मिळाला पाहिजे, यासाठी डॉ.आंबेडकरांनी भूमिका घेतली होती, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले.
            भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 जन्मशताब्दी निमित्त ओएनजीसी, मुंबई येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भिक्कु डॉ.आनंद, ओएनजीसीचे संचालक आर.के.श्रीवास्तव, कार्यकारी संचालक विजय राज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विभागप्रमुख प्रा.डॉ.विजय खरे, ऑल इंडिया एससी एसटी वेलफेअर संघटनेचे अध्यक्ष तथा ओएनजीसीचे जनरल मॅनेजर जागेश सोमकुंवर त्याचप्रमाणे संघटनेचे पदाधिकारी आणि ओएनजीसीचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी, निमंत्रित आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तीस्वातंत्र्य व मानव मुक्तीचे खंदे पुरस्कर्ते होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर येथील दलित, शोषित, आदिवासी व स्त्रियांना स्वातंत्र्याचा खरा आस्वाद घेता आला पाहिजे. त्यांना व्यक्ती म्हणून जगता आले पाहिजे. त्यांना शिक्षण घेऊन आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करता आला पाहिजे. गरिबी व दारिद्र्यातून त्यांना बाहेर येता आले पाहिजे. सर्व प्रकारच्या आर्थिक, मानसिक, सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतुन त्यांना मुक्ती मिळाली पाहिजे, ही बाबासाहेबांची स्वातंत्र्याविषयीची भूमिका असल्याचे ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी यावेळी सांगितले.
            डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना  कोणत्याही प्रकारची गुलामगिरी मान्य नव्हती. म्हणूनच देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर येथील दलित व वंचित यांनी गुलामगिरीत राहू नये, यासाठी स्वातंत्र्य, समता व बंधुत्वावर आधारित राज्यघटनेची त्यांनी निर्मिती केली. हे करीत असतांना आरक्षणाच्या माध्यमातून बहुजन व विशेषतः मागासवर्गीयांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यात. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमुळे सर्वसामान्य जनतेला रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. यामुळे मागासवर्गीय समाजाला पुढे जाता आले आहे, असे मत डॉ.राऊत यांनी यावेळी व्यक्त केले.
            यावेळी ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते एका पत्रिकेचे प्रकाशन तर सेवा ओएनजीसी या संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला. त्याचबरोबर वयाच्या 10 वर्षापासून लिखाणाला सुरूवात करून 5 पुस्तके लिहिल्याबद्दल कु.संहिता सोनवणे हिचाही सत्कार ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्ज्वलनाने आणि बुद्धवंदनेने करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या