Advertisement

Responsive Advertisement

राज्यातील कौशल्य विकासविषयक विविध योजनांचे जागतिक बँक तसेचकेंद्र शासनाच्या समितीकडून कौतूक


            मुंबई, दि. २ : संकल्प प्रकल्पांतर्गत होणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत कौशल्य विकास मंत्रालय, भारत सरकार व जागतिक बँकेमार्फत नुकतीच ७ सदस्यांनी राज्याला भेट दिली. राज्यात कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती घेऊन समिती सदस्यांनी त्याचे कौतुक केले. विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी समिती सदस्यांचे स्वागत करून त्यांना विविध योजनांची माहिती दिली.
            पथकामध्ये केंद्रशासनामार्फत आर. के. गुप्ता (संचालक-संकल्प), रुशिया ऑलख (सल्लागार), निखील जैन (सल्लागार), ज्योती सिंह (सल्लागार), श्रीमती पुष्पा (सहाय्यक अधिकारी-संकल्प) हे उपस्थित होते. जागतिक बँकेमार्फत प्रद्युमन भट्टाचार्य (शिक्षण विशेषज्ञ), संगीता पटेल (खरेदी विश्लेषक) उपस्थित होते. या प्रतिनिधींनी भेटीदरम्यान कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाला भेट देऊन संकल्प योजनेचा आढावा घेतला. तसेच राज्यात कौशल्य विकास संबधित योजना राबविताना अवलंबविण्यात येणाऱ्या उत्कृष्ट कार्यपद्धती (Best Practices) जाणून घेतल्या. याव्यतिरिक्त कौशल्य विकास कार्यक्रम राबविताना येणाऱ्या अडचणी तसेच भविष्यातील नियोजन या बाबींचाही आढावा घेण्यात आला.
            महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी राज्यात जागतिक बँकेमार्फत अनुदानित व केंद्र पुरस्कृत संकल्प योजनेंतर्गत सद्यस्थितीत यशस्वीरीत्या प्रगतीवर असणाऱ्या विविध उपक्रमांबाबत सादरीकरण केले. तसेच विविध योजना व उपक्रमांच्या यशोगाथा दाखवण्यात आल्या. संकल्प प्रकल्पअंतर्गत “उडने दो” या विशेष उपक्रमाद्वारे महिला, दिव्यांगजन, तृतीयपंथी आणि देहविक्री करणाऱ्या व इतर पिडीत महिला यांसारख्या समाजातील उपेक्षित घटकांकरिता आत्मनिर्भर होऊन आयुष्याची सुरुवात नव्या दिशेने करण्याकरिता रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षण प्रदान करण्यात येत आहे.
            याचबरोबरच आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील कौविड-१९ साथीशी संबंधीत उद्भवलेल्या परिस्थितीत Oxygen Plant या क्षेत्रातील १ हजार २०० उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेऊन महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील प्रत्येकी ३० उमेदवारांची १ तुकडी तयार करून प्रशिक्षण सुरु केले. महाराष्ट्र हे इलेक्ट्रिक वाहन धोरण आणणारे देशातील पहिले राज्य आहे. त्यादृष्टीकोनातून संकल्प प्रकल्पअंतर्गत Electric Vehicle Charging Station & Entrepreneurship अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल राज्याच्या संकल्पनेची केंद्रीय पथकाकडून प्रशंसा करण्यात आली.
            भेटीच्या दरम्यान MSME अंतर्गत कार्यरत असलेल्या IDEMI, सायन, मुंबई येथील व मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत असलेले पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी हॉस्पिटल, गोवंडी येथील अनुक्रमे Electric Vehicle Charging Station & Entrepreneurship व Oxygen Plant Maintenance या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी समवेत संवाद साधला.  प्रशिक्षणार्थी यांनी व्यक्त केलेल्या भावना व त्यांचे दैनंदिन जीवनात या प्रशिक्षणामुळे आलेल्या सकारात्मक बदलाबाबत पथकाने समाधान व्यक्त केले.
            राज्यात जिल्हा नियोजन समितीकडून किमान कौशल्य कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात यशस्वीपणे पार पाडण्यात येत आहे. तसेच योजनांचे एकसूत्रीकरण अंतर्गत राज्यात विविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या कौशल्य प्रशिक्षण योजनांवर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचा एकछत्री अंमल आणण्याबाबत शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांकरिता तयार करण्यात आलेला “जिल्हा कौशल्य विकास आरखडा” विशेष गौरविण्यात आला आहे. सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, वाशीम आणि ठाणे या ५ जिल्ह्यांनी “जिल्हा कौशल्य विकास आराखडा” (DSDP) उत्तम आराखडा प्रस्तुत केल्याने DSDP पुरस्कारासाठी या ५ जिल्ह्यांना नामांकन मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
            शांघाय (चीन) येथे होण्याऱ्या जागतिक स्पर्धेकरिता महाराष्ट्राची कामगिरी उल्लेखनीय बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी पूर्ण प्रयत्नशील आहे. या सर्व उल्लेखनिय बाबींसाठी देखील महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला.
            कौशल्य विकास विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांच्यासह कौशल्य विकास सोसायटीचे अधिकारी, कर्मचारी यांनी या भेटीचे समन्वयन केले.
या भेटीदरम्यान महाराष्ट्र राज्यात सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेल्या इतरही योजना तसेच विविध उपक्रम याबाबतच्या माहितीचे यशस्वीरीत्या सादरीकरण करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या