Advertisement

Responsive Advertisement

मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यापूर्वी भाजप, आंबेडकरी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात


औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यापूर्वी भाजपचे पदाधिकारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शहरातील पाणी प्रश्न आणि विविध समस्यांचे निवेदन भारतीय जनता पार्टी तर्फे देण्यात येत होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठच्या विभाजनास विरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा देणाऱ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरात मागील काही दिवसांपासून पाणीप्रश्नावर भाजप आंदोलन करत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शहरात सभा घेऊन पाणी प्रश्न आणि विविध समस्यांवर शिवसेनेला खुले आव्हान दिले होते. यानंतर आज सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार होते. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे शहरातील एका हॉटेलमध्ये येण्यापुर्वीच भाजपच्या पदाधिकाऱ्यांन पोलिसांनी ताब्यात घेतले. शहर जिल्हा अध्यक्ष संजय केनेकर, बापू घडामोडे, राजू शिंदे, शिवाजी दांडगे, सुहास दाशरथे, रामेश्वर भादवे, अमृता पालोदकर, सविता कुलकर्णी, माधुरी आदवंतसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन छावणी पोलीस स्टेशन येथे स्थानबद्ध केले आहे.तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विभाजनास विरोध करत मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा आंबेडकरी नेत्यांनी दिली होती. मुख्यमंत्री ठाकरे थांबणार असलेल्या शहरातील हॉटेलमधून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम, अतुल कांबळे, गुणरत्न सोनवणे यांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या