Advertisement

Responsive Advertisement

आवड आणि कल यानुसार पुढील मार्ग निश्चित करा- शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड

दहावीचा निकाल 96.94 टक्के,
मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 1.90 टक्के जास्त
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन
 
            मुंबई, दि. 17- “कोरोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीतही आपल्या विद्यार्थ्यांनी मोठ्या जिद्दीने, धैर्याने, संयमाने व परिश्रमाने अभ्यास पूर्ण करत दहावीची परीक्षा दिली. शिक्षणाप्रती त्यांच्या या समर्पणभावाला सलाम,” अशा भावना शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या संदेशामध्ये व्यक्त केल्या.
            या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे व यश संपादन करावे, असे आवाहन प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे. या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळाले नाहीत त्यांना श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत लगतच्या दोन परीक्षांमध्ये पुन:श्च परीक्षेस प्रविष्ट होता येईल. मार्च 2022 च्या परीक्षेस प्रथमच नियमित विद्यार्थी म्हणून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या) जुलै-ऑगस्ट 2022 व मार्च 2023 च्या परीक्षेस श्रेणीसुधार साठी प्रविष्ट होण्याच्या दोन संधी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
            या परीक्षेत पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,68,977 नियमित विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 15,21,003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 6,50,779 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, 5,70,027 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 2,58,027 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. “हा निकाल आनंददायक व आशादायक आहे,” असे मंत्री प्रा. गायकवाड यांनी म्हटले आहे.
            राज्यातील 12,210 शाळांचा आणि 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांची कोकण विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी 99.27 अशी सर्वाधिक असून सर्वांत कमी उत्तीर्णतेची टक्केवारी नाशिक विभागाची 95.90 टक्के अशी आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 97.96 असून मुलांची 96.06 एवढी आहे.
            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे इ.10 वीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. तर मार्च 2020 मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी 95.30 अशी होती. याचाच अर्थ मार्च-एप्रिल 2022 चा निकाल मार्च 2020 तुलनेत 1.64 टक्के वाढला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या