Advertisement

Responsive Advertisement

अब्दुल सत्तार आलेच नाही, सिल्लोडकरांचा हिरमोड

औरंगाबाद : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल सिल्लोडमध्ये येऊन वाहन रॅलीत सहभागी होऊन सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु गुवाहाटीत पाऊस आणि खराब हवामान असल्यामुळे त्यांना येता आले नाही, असे सांगत सत्तार यांची चिरंजीव समीर यांनी वेळ मारून नेली. यावेळी सत्तार समर्थकांनी वाहन रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले, तर उपस्थितांना समीर सत्तार यांनी मार्गदर्शन करत एकनाथ शिंदे व अब्दुल सत्तार यांच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहू, असे आवाहन केले.महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात महत्वाची भूमिका बजावणारे ग्रामविकास व महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आज सिल्लोडला येणार होते.एकनाथ शिंदे व सत्तार यांच्या समर्थनार्थ मतदारसंघात वाहन रॅली काढण्यात आली. अब्दुल सत्तार स्वतः या रॅली आणि सभेसाठी गुवाहाटीतून मुंबईत आणि मुंबईहून औरंगाबाद मार्गे हेलिकाॅप्टरने सिल्लोडला येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.त्यामुळे मतदारसंघातील सत्तार समर्थकांमध्ये मोठी उत्सूकता होती. त्यामुळे त्यांनी सकाळापासूनच शहरातील प्रियदर्शनी चौक आणि सत्तार यांच्या संपर्क कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती. नियोजित वेळेपेक्षा दोन ते तीन तास उशीरा वाहन रॅली सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या सभेला देखील त्यांनीच मार्गदर्शन केले.राज्यात सत्तांतराचा हायहोल्टेज ड्रामा सुरू आहे, बंडखोरांच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज्यातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशावेळी सत्तार आसामच्या गुवाहटीमधून सिल्लोडमध्ये येतील या बद्दल शंका व्यक्त केली जात होतीच. ती खरीही ठरली. सत्तार यांना पाहण्यासाठी जमलेल्या त्यांच्या उत्साही समर्थकांचा मात्र यामुळे हिरमोड झाल्याचे पहायला मिळाले. आपल्या पाठीशी किती लोक आहेत हे दाखवण्यासाठी केलेली सत्तार यांचीच ही खेळी होती हे देखील आता स्पष्ट झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या