Advertisement

Responsive Advertisement

कल्याणच्या काळातलाव परिसरातील प्रेमी युगुलांच्या अश्लील चाळयांवर मनसे महिला सेनेकडून पिटाई


प्रकाश संकपाळ

कल्याण : शहरातील काळातलाव हे ऐतिहासिक स्थान आहे.कल्याणच्या इतिहासात या तलावाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.जापूरच्या आदिलशहाने इ.स १५०६ मध्ये चारही बाजूने दगडी बांधकाम करून कल्याणमधील हा तलाव बांधला. ते बांधकाम आज अस्तित्वात नाही. पुढे १७६०-७० ला कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी तलावाचा जीर्णोद्धार केला. खापरी नळ्यांद्वारे हे पाणी वाहून नेऊन सुभेदारवाडा आणि सरकारवाड्याला लागून असलेल्या राम मंदिराशेजारील पुष्करणीत (छोटा हौद) सोडले जायचे. काळा तलाव हाच त्याकाळी शहराचा मुख्य जलस्रोत होता.
     काळाच्या ओघात इतर तलावांप्रमाणे काळातलावही बकाल झाला होता,परंतु हा तलाव हे कल्याणचे भूषण आहे. त्यामुळे या तलावाचे सुशोभीकरण झालेच पाहिजे, असा ध्यास शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आणि तलावाचे रूपडे पालटून टाकले. या तलावाचे सौंदर्य मनाला भुरळ घालते. स्मार्ट सिटीच्या कामांमुळे तलावाला नवी झळाळी प्राप्त होणार आहे. येथे सुरक्षेच्या बाबतीत मात्र ढिसाळपणा दिसतो. सकाळ-संध्याकाळी प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे बिनदिक्कत सुरू असतात. त्यासंदर्भातल्या तक्रारींकडे पोलीस देखील दुर्लक्ष करतात.
   शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या तलावाचा नागरिक शतपावली, मनोरंजन, विरंगुळ्यासाठी मनसोक्त लाभ घेतात. घटकाभर निवांतपणा हवा असेल तर या परिसराला विशेष पसंती दिली जाते. तलावाभोवती संरक्षक कठडा बांधला असून, त्याच्या बाजूला जॉगिंग ट्रॅक आहे. तलावाच्या एका बाजूला ‘ओपन जिम तयार केल्याने व्यायाम करणाऱ्यांची येथे सकाळ-संध्याकाळी गर्दी असते.
      काळातलाव परिसरात प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे मोठया प्रमाणात वाढल्यामुळे आबालवृद्धांना याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौ.स्वाती कदम यांच्याकडे आल्यावर त्यांनी स्वतः काळातलाव परिसरात जाऊन पाहणी केली असता महाविद्यालयीन मुले-मुली अश्लील चाळे करताना निदर्शनास आले म्हणून तेथील सुरक्षा रक्षकांच्या कानावर ही बाब घालण्यात आली,मात्र सुरक्षा रक्षक कोणत्या तंद्रीत असतात तेच समजत नाही.
    महिलांना शतपावली करताना अक्षरशः मान खाली घालुन चालावे लागते.अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमी युगुलांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कल्याण डोंबिवली महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तसेच कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील व महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक व्हनमाने यांना निवेदन देऊन या प्रेमी युगुलांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
     यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौ.स्वाती कदम,उपजिल्हा अध्यक्षा सौ.रेणुका शिरोडकर, जिल्हा सचिव सौ.वासंती जाधव,जिल्हा सहसचिव श्रेया भांबीड,शहर अध्यक्षा सौ.शीतल विखणकर,शहर सचिव सौ.अर्चना चिंदरकर-लाड,उपशहर अध्यक्षा सौ.गीता काट्रप,विभाग अध्यक्षा विजया शिंदे आदी महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या