Advertisement

Responsive Advertisement

खुलताबाद तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्या- डॉ.नीलम गोऱ्हे


खुलताबाद तालुक्याच्या विविध विकासकामांचा घेतला आढावा

 

औरंगाबाद :   कृषि, आरोग्य, रोजगार हमी अशा विविध विभागाच्या योजनाचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे. याशिवाय कोविड काळात विधवा झालेल्या एकल महिलांना रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण देऊन, बालकांना सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळवून द्यावा.  अशा प्रकारे  शासनाच्या विविध योजनेच्या लाभातून सर्वांगीण विकास साध्य करावा अशा सूचना खुलताबाद तालुका प्रशासनास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. खुलताबाद तहसील कार्यालयात  तालुक्यातील विकास कामांचा आढावा डॉ.गोऱ्हे यांनी घेतला. या बैठकीस उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार किरण देशमुख,तालुका आरोग्य अधिकारी  डॉ किरण शिंदे, गट विकास अधिकारी  श्री सुरडकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी सविता बिक्कड, यांच्यासह  महिला पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी नैसर्गिक आपत्ती संदर्भात उपाय योजना, मॉन्सून पूर्व तयारी, अन्नधान्य पुरवठा, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत, रोजगार हमी योजना, तालुक्याला आवश्यक निधी, महिला दक्षता समिती आदींचा आढावा घेतला. सामान्यांच्या विकासासाठी   शासनाचे विविध विभाग  चांगले काम करत आहे.  नाविन्यपूर्ण उपक्रमातून महिला, बालक आणि शेतकरी यांना सर्व लाभ मिळवून द्यावेत, खुलताबाद तालुक्यातील उभारी 2.0 अंतर्गत  आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना त्यांच्या नावावर सातबारा करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असून, कोविड मध्ये ज्या महिला विधवा झाल्या आहेत त्यांच्या नावावर ही शेती अथवा मालमत्ता हस्तांतरण करण्याची प्रक्रिया जलद  राबवावी, अशी सूचनाही डॉ.गोऱ्हे यांनी अधिकाऱ्यांना केली.

कोविडने पती गमावलेल्या विधवा महिलांना बी-बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा कृषी विभागाने आयोजित कराव्यात. सानुग्रह अनुदान, महिला आर्थिक विकास महामंडळ,याबरोबरच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मौलाना आझाद विकास, महामंडळाच्या कर्ज योजनांचा महिलांना लाभ मिळवून द्यावा. त्याचबरोबर कोविडमुळे जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा.बोगस बियाणे उत्पादन केलेल्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे निर्देश कृषि अधिकारी यांना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

 कोविड कालावधीत पालक गमावलेले पाल्य, कोविड काळातील लसीकरण नियोजन, सद्यस्थितीत करत असलेल्या उपाययोजना, मॉन्सून पूर्व तयारी, मुख्यमंत्री पाणंद रस्ते, पाणी पुरवठा योजना, कृषी आदींसह विभागाच्या विविध योजना आणि कामांचा त्यांनी सविस्तर आढावा  डॉ .गोऱ्हे यांनी घेतला. बैठकीनंतर विविध प्रकारचे निवेदन स्वीकारून प्रलंबित विकास कामाबाबत सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अंमलबजावणीबाबत सूचना नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या